माजी खासदार संजय काकडे यांना महापालिकेचा दणका! 30 दिवसांत अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटिस, अन्यथा बांधकाम पाडण्याचा इशारा

- तब्बल 671 चौ.मी. विनापरवाना बांधकाम केल्याचे नोटिसीत नमुद

    पुणे : भाजप नेते व माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. संजय काकडे यांच्या मालकीच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामास पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने नोटीस दिली आहे. मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर विनापरवाना 251 चौ. मी व तिसऱ्या मजल्यावरील 420 चौ. मी. चे संपूर्ण बांधकाम अनधिकृत असल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे. याप्रकरणी 30 दिवसांत सदरील बेकायदेशीर बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

    माजी खासदार संजय काकडे यांच्या मालकीच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी तक्रारदार योगेश कदम यांनी दोन दिवसापूर्वी नव्याने निवेदन देत काकडे पॅलेसच्या बेकायदेशीर बांधकामावर कार्रवाई करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन मनपाच्या बांधकाम विकास विभागाने बुधवारी ( ता. 11 ) प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचासमक्ष सदर मंगल कार्यालयाच्या बांधकामाचा पंचनामा केला. यामध्ये काकडे पॅलेस मंगल कार्यालयामध्ये बेकायदेशीररित्या तिसरा मजला बांधल्याचे दिसून आले.

    30 दिवसांत बांधकाम पाडण्याचे आदेश..

    याप्रकरणी पालिका प्रशासनाने बुधवारी ( ता. 11 ) माजी खासदार संजय काकडे यांना नोटिस काढली आहे. यामध्ये दिलेल्या तपशील नुसार मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील 251 चौ.मी चे बांधकाम, तसेच मंगल कार्यालयाचा तिसऱ्या मजल्यावरील संपूर्ण बांधकाम 420 चौ. मी असे एकूण 671 चौ. मी. चे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. सदरील अनधिकृत बांधकाम 30 दिवसांत काढून घ्यावे, तसेच मिळकत पूर्ववत करावी, असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. अन्यथा पालिका प्रशासनातर्फे सदरील बांधकामावर कारवाई करण्यात येईल. यासाठी येणारा सर्व खर्च वसूल करण्यात येईल, असे नमूद केले आहे.

    20 वर्षांपासून अनधिकृतपणे वापराची चर्चा..

    कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयात अनधिकृत बांधकामास पालिका प्रशासनाने नोटिस दिली आहे. दरम्यान, काकडे यांच्या मालकीच्या या इमारतीचे बांधकाम तब्बल 20 वर्षापूर्वी करण्यात आल्याची चर्चा आहे. सदरील इमारतीचा व्यावसायिक वापर होत असल्याचे पालिकेने काढलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. एकीकडे सामान्य नागरिकांच्या छोट्याशा पत्र्याच्या शेडवर, टपऱ्यांवर जलद गतीने कारवाई करणाऱ्या प्रशासनाने काकडे यांच्या बेकायदेशीर बांधकामावर सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याने सामान्य नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.