टँकर व्यावसायिकांवर पालिकेची नजर; रस्त्यावर पाणी सांडणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

टँकरमधील गळती न रोखणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका दंडात्मक कारवाई होणार आहे.

  पुणे : पुणे शहरात विविध भागात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमधील पाणी वाचवण्यासाठी महापालिकेने काढलेल्या परिपत्रकाकडे टँकर व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर सांडून वाया जात आहे. यापुढे टँकरमधील गळती न रोखणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे.

  शहरातील अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेचा पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठेकेदार नियुक्त केले आहे. तर काही खाजगी टँकर व्यावसायिकांकडून पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा करताना टँकर मधील पाणी वाहतूक करताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सांडत असते. यामुळे रस्त्यावर पाण्याचे ओघळ निर्माण होतात. तसेच चढाच्या ठिकाणी टँकर मधून मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर सांडत असते. टँकरच्या वॉल मधून देखील पाण्याची गळती होत असते. या पाण्याच्या गळतीमुळे रस्ता ओला आणि निसरडा होऊन अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

  या पार्श्वभूमीवर महापालिकेने तीन महिन्यापूर्वी एक परिपत्रक जारी करून टँकर व्यावसायिकांनी पाण्याची वाहतूक करताना होणारी गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या होत्या. पुणे शहरात उंचावरील भाग व ज्याभागामध्ये लाईनद्वारे पुरेसा पाणीपुरवठा होत नाही शा ठिकाणी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरद्वारे विविध ठिकाणच्या टँकर पॉईट वरून पाणीपुरवठा केला जातो. या मध्ये बऱ्याच वेळा टँकरचे झाकण लावले जात नाही. तसेच टँकरचे नळ व्यवस्थितरित्या बंद केले जात नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी पडून अपघात होतात व पाण्याचा अपव्यय होत आहे. या बाबत शहरातील नागरिकांच्या तक्रारी खात्यास प्राप्त झाल्या आहे.

  तरी सर्व टँकर भरणा केंद्रावरील कर्मचार्यांना सूचित करण्यात येते की टैंकर भरून झाल्यानंतर टँकरचे झाकण लावल्याशिवाय टँकर भरणा केंद्रावरून टँकर बाहेर पडू देऊ नये, याबाबत यापूर्वीही वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापुठे टँकर मधून काही पाण्याची गळती आढळल्यास ठेकेदार व टँकर भरणा केंद्रावरील कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे या परिपत्रकात नमूद केले होते.

  व्यावसायिकांचे दुर्लक्ष

  एकीकडे महापालिकेकडून पाणी पुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पण टँकर व्यवसायिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. या सूचनांकडे टँकर व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले आहे. यामध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा ठेकेदार आणि खाजगी व्यावसायिक यांचा समावेश आहे .विशेषत: शहराच्या उपनगरातील भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अशा ठिकाणी रस्त्यांवर टँकर मधून पाणी रस्त्यावर सांडत असल्याचे चित्र दिसत असते. महापालिकेने परिपत्रक काढून देखील अद्यापही टँकर व्यावसायिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.

  टँकरमधून पाणी वाहतूक करताना होणारी गळती रोखण्यासाठी तीन महिन्यापूर्वी एक परिपत्रक जारी केलेले आहे. त्याचे व्यावसायिकांकडून पालन होत नसल्याचे निर्दशनास आले आहे. यामुळे पुढील काळात संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल.

  - इंदरभान रणदिवे, पाणीपुरवठा अधिकारी, महापालिका