गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज; विसर्जन घाटांवर विविध सुविधा

गणपती बाप्पा निघाले गावाला... चैन पडेना आम्हाला ! गेल्या दहा दिवसापासून उत्साहात सुरु असलेल्या गणेशाेत्सवाची आज दिमाखदार विसर्जन मिरवणुक साेहळ्याने सांगता हाेत आहे.

    पुणे : गणपती बाप्पा निघाले गावाला… चैन पडेना आम्हाला ! गेल्या दहा दिवसापासून उत्साहात सुरु असलेल्या गणेशाेत्सवाची आज दिमाखदार विसर्जन मिरवणुक साेहळ्याने सांगता हाेत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यंदा मिरवणुकीत लवकर सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला असुन, यामुळे मिरवणुक लवकर संपण्यास कितपत उपयाेग हाेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ढाेल – ताशा पथकांकरीता केलेल्या नियमावली आणि स्पीकरच्या आवाजाच्या मर्यादेवर पाेलिस काय भुमिका घेतात, यावर देखील चित्र अवलंबुन आहे.

    गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका, पाेलिस प्रशासनाने तयारी केली आहे. महात्मा फुले मंडई येथील लाेकमान्य टिळक आणि लाेकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुक साेहळ्यास सकाळी दहाच्या सुमारास प्रारंभ हाेईल. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित राहतील.

    मानाचा पहीला कसबा गणपती पालखीतून मार्गस्थ झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ हाेईल. त्यापाठाेपाठ इतर मानाचे चार गणपती जातील. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यंदा विसर्जन मिरवणुकीत मानाचे गणपती गेल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास बेलबाग चाैकातून लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी रात्री उशिरा मिरवणुकीत सहभागी हाेणारा हा गणपती यंदा लवकरच मार्गस्थ हाेणार असल्याने भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. हा गणपती लवकर मार्गस्थ झाल्याने त्याचा विसर्जन मिरवणुकीवर काय परीणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    विसर्जन मिरवणुकीत सहभागी हाेणाऱ्या ढाेल ताशा पथकांविषयी तक्रारी येत आहेत. यापार्श्वभुमीवर विसर्जन मिरवणुकीत सहभागी हाेणाऱ्या ढाेल ताशा पथकांसाठी पाेलिसांनी नियमावली जारी केली आहे. त्याचे तंताेतंत पालन हाेणार का ? तसे झाले तर विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी हाेण्यास मदत हाेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    मुख्य मिरवणुक मार्ग असलेला लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावरून गणेश मंडळे लाेकमान्य टिळक चाैकात ( अलका टाॅकीज चाैक ) येथे एकत्र येतात. या ठिकाणी महापालिकेकडून स्वागत कक्ष उभा केला आहे. या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी गणेश मंडळांचे श्रीफळ देऊन स्वागत करतील. तसेच टिळक रस्त्यावर साहित्य परिषद , केळकर रस्त्यावर माती गणपती-नारायण पेठ येथेही स्वागतासाठी मंडप उभारण्यात येणार आहे.

    विसर्जनासाठी केलेली व्यवस्था

    – विसर्जनासाठी ४२ बांधीव हौद

    – विसर्जनासाठी १५० फिरते हौद

    – शहरात २६५ ठिकाणी ५६८ लोखांडी टाक्या

    – शहरात ११८३ स्वच्छतागृह

    – ४०० फिरती स्वच्छतागृह

    – २५२ मूर्ती संकलन व मूर्ती दान केंद्र

    – २५६ ठिकाणी निर्माल्य कलश