अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असलेल्या पतीचा खून; पत्नीच्या मित्राने गाडी अंगावर घालून चिरडले

अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून मोटार अंगावर घालून तरुणाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    नारायणगाव : अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून मोटार अंगावर घालून तरुणाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महिलेसह दोन जणांना (दि.12) रोजी रात्री अटक केली आहे.याबाबत नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे यांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी दुपारी नारायणगाव येथे पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या अयोध्या हॉटेल समोर ही घटना घडली. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

    मोटार अंगावर घालून साबीर मोहंमद शफी ब्यापारी (वय-४५, राहणार पणसुंबा पेठ, जुन्नर ) याचा खून केल्या प्रकरणी मुख्य आरोपी अभिजित जालिंदर सोनवणे (वय-२८, राहणार डिंगोरे, ता. जुन्नर) व सह आरोपी महिला जेबा इरफान फकीर (वय-३२,पणसुंबा पेठ, जुन्नर) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साबीर मोहंमद शफी ब्यापारी व जेबा इरफान फकीर हे दोघेही विवाहित असून जुन्नर येथे शेजारी राहण्यास आहेत. साबीर हा जेबा हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. जेबा ही कांदळी औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामास होती. नोकरी निमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी अशी ये जा करत असे. अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासा दरम्यान जेबा व अभिजित यांची ओळख झाली होती. या माध्यमातून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. ही माहिती साबीर मोहंमद शफी ब्यापारी याला होती. यावरून साबीर व अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता.

    रमजान सणासाठी गुरुवारी अभिजित हा जेबा हिच्या घरी आला होता. या वेळी तू येथे का आलास असा जाब साबीर याने अभिजित याला विचारला. या वरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला.शुक्रवारी सकाळी जेबा कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली होती. दरम्यान साबीर याने तिचा पाठलाग सुरु केला. या बाबतची माहिती जेबा हिने मोबाईल कॉल करून अभिजित याला दिली होती. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साबीर हा येथील पुणे नाशिक महामार्ग लगत असलेल्या आयोध्या हॉटेल येथे उभा होता. दरम्यान अभिजित याने साबीर याच्या अंगावर मोटार घालून त्याला चिरडले. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच साबीर याचा मृत्यू झाला.

    शुक्रवारी सायंकाळी जुन्नर येथील मुस्लिम समाजाचा मोठा जनमुदाय नारायणगाव येथील पोलीस पोलीस ठाण्यात जमा झाला होता. आरोपीला अटक करण्याची मागणी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी पिंपळवंडी येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर महिलेला सुद्धा ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून संगनमताने हा गुन्हा केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी अभिजित सोनवणे व सह आरोपी महिला जेबा इरफान फकीर या दोघांनाही अटक करून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आज शनिवारी जुन्नर न्यायालयात दोन्हीही आरोपींना हजर केले असता त्यांना तीन दिवस म्हणजेच १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरक्षक महादेव शेलार करत आहे.