प्रेमप्रकरणातून तरुणीची धारदार शस्त्राने हत्या; आरोपीच्या पत्नीनेच रचला कट

प्रेमप्रकरणातून 24 वर्षीय तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या (Murder of Young Girl) करण्यात आली. सेलू तालुक्यातील (Selu Taluka) दहेगाव गोसावी गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. यात दोन तरुणींचा समावेश आहे.

  वर्धा : प्रेमप्रकरणातून 24 वर्षीय तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या (Murder of Young Girl) करण्यात आली. सेलू तालुक्यातील (Selu Taluka) दहेगाव गोसावी गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. यात दोन तरुणींचा समावेश आहे. या घटनेतील मुख्य आरोपी फरार आहे.

  अंकिता सतिश बाईबोडे (वय 24) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता ही घरी होती. त्यावेळी दुचाकीवरून चार जण दहेगावात दाखल झाले. थेट अंकिता सतीश बाईलबोडे हिचे घर गाठले. मागच्या बाजूने लोखंडी फाटक उघडून सरळ आत शिरले. लोखंडी फाटकाचा आवाज ऐकू आल्याने अंकिता बाहेर निघाली. त्यावेळी दोघांनी पकडून तिसऱ्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने अंकिताच्या गळ्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले.

  दरम्यान, आरडाओरड झाल्याने अंकिताची आई आतल्या खोलीतून बाहेर आली. अंकिताला मारहाण करताना दिसून आल्याने आरडाओरडा सुरू केला. अंकिताच्या आईला पाहून आरोपींनी पळ काढला. परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच जखमी अंकिताला गावातील नागरिकांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

  संतप्त नागरिकांनी पेटवली दुचाकी 

  घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांचा राग अनावर झाल्याने आरोपींच्या दुचाकीला आग लावून पेटवून दिली. रात्री सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  आरोपीच्या पत्नीने रचला कट

  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. मृत तरुणी आणि आरोपीच्या अनैतिक संबंधाची माहिती आरोपीच्या पत्नीला मिळाली होती. यातूनच युवतीला मारण्याचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.