कुऱ्हाडीने वार करून सुनेची हत्या; वहिनीचे कानच छाटले; गोंदियात प्रचंड खळबळ

क्षुल्लक कारणातून होत असलेल्या वादाला कायमस्वरूपी विराम लावण्यासाठी सुनेवर कुऱ्हाडीने वार करून (Murder of Woman) ठार केले. तर वहिनीचे कुऱ्हाडीने कान छाटल्याची घटना तालुक्यातील देवरी (धापेवाडा) येथे रविवारी (ता. 24) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

    गोंदिया : क्षुल्लक कारणातून होत असलेल्या वादाला कायमस्वरूपी विराम लावण्यासाठी सुनेवर कुऱ्हाडीने वार करून (Murder of Woman) ठार केले. तर वहिनीचे कुऱ्हाडीने कान छाटल्याची घटना तालुक्यातील देवरी (धापेवाडा) येथे रविवारी (ता. 24) दुपारी बाराच्या सुमारास घडली. आरोपीचे नाव प्रितमलाल सहेसराम ठाकरे (वय 55 रा. देवरी) असून, सुनीता दिनेश ठाकरे (वय 35) असे मृत सुनेचे तर रिमनबाई प्रेमलाल ठाकरे (वय 60) असे गंभीर जखमी झालेल्या वहिनीचे नाव आहे. या घटनेमुळे देवरीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    गोंदिया तालुक्याच्या देवरी (धापेवाडा) येथील आरोपी प्रितमलाल हा क्षुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा. दरम्यान, घटनेच्या दिवशी 24 सप्टेंबर रोजी मृत सुनीता ठाकरे व तिची सासू रिमनबाई ठाकरे या दोघीही घरीच होत्या. तिचे पती झिटाबोडी येथे गेले होते. तर सासरे हे शेतात गवत आणायला गेले होते. यावेळी घरात पुरुष मंडळी नसल्याचे पाहून आरोपी प्रितमलालने सासू-सुनेसोबत वाद घातला. झालेल्या वादात आरोपीने कुऱ्हाड आणून सुनीताच्या गळ्यावर, डोक्यावर सपासप वार केले.

    तेरवीला जाण्याचे होते नियोजन

    आरोपीचा भाऊ प्रेमलाल ठाकरे व वहिनी रिमन ठाकरे हे दोघेही शेजारच्या गिरोला येथे एका नातेवाईकाच्या घरी तेरवीच्या कार्यक्रमाला जाण्याचे नियोजन करत होते. जनावरांसाठी गवत आणतो त्यानंतर तेरवीला जाऊ असे प्रेमलाल यांनी पत्नी रिमन यांना सांगून ते शेतात गवत आणायला गेले होते; परंतु शेतातून घरी परतताच प्रेमलाल यांना सुनेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर पत्नी गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली.