क्रेडिट कार्डचे हप्ते न भरल्यावरून खून; आरोपी १० तासांत जेरबंद

क्रेडिट कार्डवर लोन घेतल्यानंतर त्याचे हप्ते न भरणाऱ्या मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट पाचने त्यांना केवळ १० तासात जेरबंद केले.

  पुणे : क्रेडिट कार्डवर लोन घेतल्यानंतर त्याचे हप्ते न भरणाऱ्या मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट पाचने त्यांना केवळ १० तासात जेरबंद केले. कोंढवा येथील पारसी मैदानावर ही घटना घडली होती.

  शहानवाज उर्फ बबलू मुनीर सय्यद (वय ५५ रा. ताहिर हाईट्स, भाग्योदय नगर, कोंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी जावेद खान (वय २६ रा. किंग स्टन इलेसिया सोसायटी, पिसोळी) याला अटक केली आहे. तसेच त्याचे साथीदार सद्दाम शेख व साहिल शेख यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ताब्यात घेतले. कोंढवा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर दहा तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  ही कारवाई परिमंडळ पाचचे उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील, पोलीस अंमलदार राहुल वंजारी, रोहित पाटील यांच्या पथकाने केली.

  कोंढवा येथील पारसी मैदानावर एकाचा मृतदेह असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी येथे धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला होता. तेव्हा पोलीस अंमलदार विकास मरगळे व जयदेव भोसले यांना माहिती मिळाली की, पिसोळी भागातील बंद बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती काल रात्रीपासून घाबरलेल्या अवस्थेत थांबला आहे. त्याने गुन्हा केला असल्याची शक्यता आहे. तपास पथकाने पिसोळी भागातील धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या बिल्डिंच्या टेरेसवर लपून बसलेल्या जावेद खान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

  तर समांतर तपास करणारे गुन्हे शाखेच्या युनिट पाचला या खूनातील दोन आरोपींची माहिती मिळाली. त्यानूसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी व त्यांच्या पथकाने साहिल युसुफ शेख (वय २३, रा पिसोली कोंढवा) सज्जुद्दिन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख (वय ३५) यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

  खूनाचे दोन दिवसांपासून प्लॅनिंग…

  दोन ते तीन दिवसांपुर्वी मयत शहानवाज व आरोपींची दोन वादावादी झाली होती. तेव्हा आरोपींनी शहानवाज याचा खून करण्याचे प्लॅनिंग केले. त्याला दारू पिण्यासाठी म्हणून मैदानावर नेले. त्याठिकाणी दारू पाजून त्याचा धारधार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.