पत्नीचा खून केला अन् आत्महत्येचा रचला बनाव; पतीला अटक, पुण्यातील मध्यवर्ती भागातील घटना

  पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा दाबून खून केला. पण, पतीने पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला अन् पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मात्र, घटनास्थळाची पाहणी केली आणि तासाभरात खुनाचा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी या बनाव रचणाऱ्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील भवानी पेठेत हा प्रकार घडला आहे.

  समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा

  नुरजहा शफीक पटेल (वय ४०, रा. मंजुराबाई चाळ, भवानी पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी पती शफीक पेटल (वय ४४) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  कौटुंबिक कारणातून सतत वाद

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफीक पेटल हा बिगारी टेलरिंगचे करतो. पटेल कुटूंब मुळचे उत्तरप्रदेशचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातच राहतात. दरम्यान, शफीक व पत्नी नुरजहा यांच्यात कौटुंबिक कारणातून सतत वाद होत असत. त्यामुळे शफीकने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

  पत्नीला केले रुग्णालयात दाखल
  दरम्यान, मंगळवारी रात्री देखील त्यांच्यात वाद झाले. वादातून शफीक याने पत्नीचा गळा आ‌वळून खून केला. पण, हा प्रकार समजू नये म्हणून पत्नीला रुग्णालयात दाखल केले आणि पोटात दुखत असल्याचे सांगितले. परंतु, उपचारापूर्वीच नुरजहा यांचा मृत्यू झालेला होता. तसेच, गळ्यावर व्रण असल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यांनी याची माहिती समर्थ पोलिसांना दिली.

  पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबुली

  त्यानंतर लागलीच समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश शिंदे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टरांच्या माहितीवरून पती शफीक याच्याकडे विचारपूस केली. पण, त्याने तिने आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने पोलीस खाक्या दाखविताच शफीकने वादातून पत्नीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानतंर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.