प्रेयसीसह तिच्या दोन मुलांचा खून करणारा जाळ्यात, कोंढवा पोलिसांची कारवाई; गावाला पळून जाताना सापळा रचून पकडले

अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसी आणि तिच्या दोन लहान मुलांचा खून करून त्यांचे मृतदेह पत्र्याच्या शेडमध्ये जाळणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी अटक केली. तो गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला तपास पथकाने पकडले.

    पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून प्रेयसी आणि तिच्या दोन लहान मुलांचा खून करून त्यांचे मृतदेह पत्र्याच्या शेडमध्ये जाळणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी अटक केली. तो गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला तपास पथकाने पकडले.

    वैभव रूपसेन वाघमारे (वय २६, रा. मु.पो. लोहटा, ता. औसा, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने त्याची प्रेयसी आम्रपाली रमेश वाघमारे (वय २४), आदित्य (वय ४) आणि रोशनी (वय ६) यांचा खून केला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

    कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे तसेच पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या सूचनेनुसार तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, धर्मावत पेट्रोलपंपाच्या मागील महात्मा जोतिबा फुले शाळेजवळ पत्र्याच्या शेडमध्ये ३ मृतदेह जळत आहेत. ही धक्कादायक समजताच पथकाने येथे धाव घेतली. वरिष्ठांना याची माहिती देऊन तपास सुरू केला होता. तिघांचे मृतदेह पुर्णपणे जळालेले होते. त्यात एक स्त्री जातीचे व दोन बालकांचे अर्धवट जळालेले काळे ठिकूर पडलेले व हाडे दिसत असलेले नुकतेच जळालेले मृतदेह दिसले.

    पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी वैभव हा आम्रपाली हिच्यासोबत रहात असल्याची माहिती मिळाली. आरोपीचा शोध घेत असताना तो गावी पळून जात असल्याचेही समजले. यानुसार पथकाने त्याला सापळा रचन बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.