म्हसवडच्या मुसाभाईंचा क्रीडारत्न पुरस्काराने गौरव; गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते सन्मानित

ज्या वयात माणसाला नीट चालता येत नाही, त्या वयात नवंनवीन एका मागूनएक असे विक्रम करणाऱ्या म्हसवडच्या मुसा दादुभाई मुल्ला यांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी दै. नवराष्ट्रच्या वतीने क्रीडारत्न हा पुरस्कार राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

    म्हसवड : ज्या वयात माणसाला नीट चालता येत नाही, त्या वयात नवंनवीन एका मागूनएक असे विक्रम करणाऱ्या म्हसवडच्या मुसा दादुभाई मुल्ला यांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी दै. नवराष्ट्रच्या वतीने क्रीडारत्न हा पुरस्कार राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

    वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या म्हसवडच्या मुसाभाईंचा या वयातील उत्साह हा अगदी तरुणांना लाजवेल असा आहे, त्यांनी या वयातही नव नवीन विक्रम करण्याचा जो पराक्रम केला आहे त्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वीच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने सन्मानित करत त्यांची नोंद या बुकात केली आहे. जागतिक दर्जाचा धावपटु ठरलेला हुसेन बोल्ट याने १० सेंकदामध्ये १०० मिटर धावण्याचा जो विश्वविक्रम केला आहे, त्याने प्रेरणा घेत मुसाभाईंनी ही या वयात धावण्याचा सराव सुरु करीत अवघ्या ९ सेंकदामध्ये ५० मीटर धावण्याचा नवा विक्रम केला आहे.

    विश्वविक्रम केलेल्या हुसेन बोल्टचे रेकॉर्ड करतेवेळी वय वर्ष २८ होते. तर त्याच्या निम्मे अंतर कापणाऱ्या मुसाभाईंचे वय अवघे ७५ होते. त्यामुळे या वयात त्यांनी हा केलेला विक्रम म्हणजे ७५ वर्षाचे वृध्द की ७५ वयाचा जवान असे सर्वजण त्यांना संबोधत आहेत. अशा या अवलियाचा या वयातील उत्साह पाहून त्यांचा पराक्रम पाहुून त्यांना नवी ऊर्जा मिळावी यासाठी दै. नवराष्ट्रच्या वतीने क्रीडारत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मुसाभाई मुल्ला यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांचे संपूर्ण म्हसवडकरांतून अभिनंदन होत आहे.

    दै.नवराष्ट्रने केलेला गौरव नवी ऊर्जा देईल : मुसाभाई मुल्ला 

    उतारवयात माणसाला धड चालता येत नाही. उतारवयात व्यक्ती घरात कमी अन् रुग्णालयात जास्त असते. मात्र, आज मी ७६ व्या वर्षेही पूर्णपणे तंदुरुस्त आहे. लहानपणापासूनच कष्टाची सवय असल्याने मी सतत कामात राहिलो. त्यामुळे शरीर तंदुरुस्त बनले तर या वयातही मी चालणे, धावणे, पोहणे आदी प्रकार करत असल्याने मला आजअखेर कोणतीही शारीरिक व्याधी नाही. माझ्या पाठीशी माझी पत्नी व मुलगा ठामपणे असल्यानेच मी हे साहस करीत असलो तरी माझ्या या प्रयत्नाला नवराष्ट्रची आता साथ मिळाल्याने मला नवी उर्जा मिळेल, असे विक्रमवीर मुसाभाई मुल्ला यांनी सांगितले.