मुस्लीम समाजाच्या दोन पंथीयांचा मशीदीतच राडा, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सुन्नी मुस्लीम सुफी पंथीय पक्षाचे जावेद मौलवी यांचा आरोप आहे की, मशीदीत प्रवचन देण्याकरीता गेले असता त्याठिकाणी शरफूद्दीन कर्ते आले.

    कल्याण : कल्याणमध्ये मुस्लीम धर्मातील दोन पंथ मानणाऱ्या लोकांमध्ये मशीदीतच जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप केला आहे. पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. त्या जमावाला पोलिसांनी कसा बसे पांगवले. या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

    कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात जामा मशीद आहे. या मशीदीत गुरुवारी रात्री जावेद अहमद मौलवी हे ग्यारवी शरीफ निमित्त प्रवचन करीत होते. यावेळी त्यांची धार्मिक प्रार्थना सुरु होती. याचवेळी वाहबी पंथीय मशीदीचे ट्रस्टी शरफूद्दीन कर्ते या ठिकाणी आले. ते आल्यावर मोठा वाद झाला. शरफूद्दीन कर्ते हे वाहबी पंथीय आहेत. दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. यामुळे काही काळ मशीदीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्वरीत त्याठिकाणी बाजारपेठ पोलीस दाखल झाले. दोन्ही गटांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले.

    या प्रकरणी सुन्नी मुस्लीम सुफी पंथीय पक्षाचे जावेद मौलवी यांचा आरोप आहे की, मशीदीत प्रवचन देण्याकरीता गेले असता त्याठिकाणी शरफूद्दीन कर्ते आले. त्यांनी शिवीगाळ करीत ग्यारवी बंद करा. हे काय चालले आहे तुमचे. हे बोलणे सुरु केले. जावेद मौलवी यांच्यासह त्यांच्या सहकारी वर्गाने प्रवचन सुरुच ठेवले. त्यानंतर पुन्हा शरफूद्दीन कर्ते यांनी शिवीगाळ करुन नियाजवर लाथ मारली व फियादीची धार्मिक ग्रंथाची पिशवी फेकून दिली. त्यामुळे वाद जास्त वाढला.

    या बाबत वाहबी पंथीय जामा मशीदचे ट्रस्टी शरफूद्दीन कर्ते यांचा आरोप आहे की, जामा मशीदीत जावेद मौलवी यांच्याकडून चुकीचे धार्मिक प्रवचन सुरु होते. त्यामुळे वाहबी अहिले हदीस देवबंदी पंथाच्या लोकांच्या भावना दुखावतील असे वाक्य वापरत होते. इतकेच नाही तर त्यांनी त्याच्या भाषणात सांगितले की, आम्हाला या ठिकाणी नमाज अदा करु देत नाही. प्रवचनाच्या बहाण्याने कब्जा करुन कोणी आलं तर ठोकून काढू. त्यासोबतच एका पवित्र पुस्तकाला लाथ मारली. असा आरोप शरफूद्दीन कर्ते यांनी मौलवीवर आरोप केला आहे. या बाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनिल पवार यांनी सांगितले की, दोघांच्या विरोधात आयपीसी २९५ ५०४ ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.