मविआला मुस्लीम मत पाहिजे पण… प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

    मुंबई – वंचित बहुजन आघाडीसोबत अनेकदा चर्चा करुन देखील प्रकाश आंबेडकर व महाविकास आघाडीमध्ये समविचार झाला नाही. जागावाटपावरुन वंचित महाविकास आघाडीमध्ये सामील न होता एकला चलो रे या भूमिकेवर राहिली. यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर ठाकरे गट, शरद पवार गट व कॉंग्रेसवर गंभीर आरोप देखील केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

    प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. जर भाजपाप्रमाणे महाविकास आघाडीही मुस्लिम उमेदवार देत नसेल तर दोघांमध्ये फरक काय?” असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. तसंच, “महाविकास आघाडीला मुस्लीम मते पाहिजे, पण मुस्लीम उमेदवार नको”, असा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

    वंचित बहुजन आघाडीने राज्यभरामध्ये 20 हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीसोबत न जाता एकट्याने निवडणूक लढण्याचा पवित्रा घेतला. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या ज्या याद्या जाहीर झाल्या आहेत, त्यामध्ये उमेदवारांच्या नावापुढे त्याची जात लिहिलेली आहे. वंचितने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेसच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात मात्र काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे.