MLA Sandeep Kshirsagar's explanation in the House
MLA Sandeep Kshirsagar's explanation in the House

  मुंबई : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मराठा आरक्षण आणि बीडमध्ये घडलेल्या जाळपोळीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये घडलेल्या घटनेचा इतिवृत्तांत दिला. ती घटना मराठा आंदोलकांनी केली नाही, अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली आहे. क्षीरसागरांनी छगन भुजबळ यांनाही एक आवाहन केले आहे.

  बीडमधली जाळपोळीची घटना दुर्दैवी

  आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीडमधली जाळपोळीची घटना दुर्दैवी आहे. हल्लेखोरांनी मंदिरसुद्धा फोडली आहेत. माझ्या घरी जाळपोळ झाली, पंडितांच्या घरी दगडफेक केली तिथून बस स्थानकातही दगडफेक केली आणि मग ते निवांतपणे निघून गेले. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे, हे तपासणे गरजेचे आहे.

  आपले कौटुंबिक संबंध आहेत

  क्षीरसागर पुढे म्हणाले, छगन भुजबळ साहेबांनी घरी भेट दिली, आपले कौटुंबिक संबंध आहेत. परंतु, एक आमदार म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, या घटनेत मराठा समाजाच्या आंदोलकांचा कोणाचाही संबंध नाही. इतर समाजाचाही संबंध नाही. ते गावगुंड होते, ते कुणाशी ना कुणाशी निगडीत होते, यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर ते कुणाशी बोलत होते ते लक्षात येईल.

  काय म्हणाले संदीप क्षीरसागर?

  बीडचा प्रकार पूर्ण महाराष्ट्राने बघितला. त्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माझे घर जळाले आहे, माझा मुलगा अडचणीत होता. भुजबळांना विनंती आहे की, याच्या खोलापर्यंत गेले पाहिजे. याचा तपास न्यायालयामार्फत केला पाहिजे.. तशी मागणी केली पाहिजे.

  गृहमंत्र्यांनी याबाबत न्यायालयीन चौकशी लावावी

  माझं घर आणि बीड जेव्हा जळत होते, त्या सात ते आठ तासात पोलिस प्रशासन तिथं का आलं नाही. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी खडसेंची तब्येत खराब झाली तर एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. परंतु माझं घर आणि माझं शहर सात ते आठ तास जळत होतं.. पोलिस मुख्यालय माझ्या घरासमोर होतं.. पोलिसांनी का योग्य कारवाई केली नाही? पोलिसांचाही याच्यात दोष नाहीये. परंतु त्या सात ते आठ तासात त्यांचे हात कुणी बांधले होते?. गृहमंत्र्यांनी याबाबत न्यायालयीन चौकशी लावावी, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.