‘निखिल शेंडे निर्दोष, तो कधीही चुकीचं वागणार नाही’, हनी ट्रॅप प्रकरणात नाव आल्यानंतर निखीलच्या आईचा काय दावा?

‘डीआरडीओ’ (DRDO) या प्रसिद्ध संशोधन संस्थेच्या डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) या शास्त्रज्ञाला दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

    नागपूर : ‘डीआरडीओ’ (DRDO) या प्रसिद्ध संशोधन संस्थेच्या डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) या शास्त्रज्ञाला दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी एजंटला गुप्त माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या आरोपातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. आता कुरुलकरांप्रमाणे हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे (Nikhil Shende) यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला.

    शेंडे हे सध्या बंगळुरू येथे नियुक्तीस आहेत. त्यांची हवाई दलातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर त्यांच्या आईने आपला मुलगा निर्दोष असल्याचे म्हटलं आहे. हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या निखिल शेंडे यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडूनही (ATS) त्यांची चौकशी करण्यात आली असून, त्यांचा शिवाजीनगर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी मुलाचे नाव आल्याने निखिल शेंडे यांची आई लीला शेंडे यांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला.

    माझा मुलगा निर्दोष

    निखिल शेंडे यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यावर लीला शेंडे यांनी आपला मुलगा निर्दोष आहे. तो असे कृत्य करूच शकत नाही. त्याचं पेपरमध्ये नाव आल्यानंत आम्हाला याची माहिती मिळाली. चौकशीसाठी नेल्याचे निखिलने आम्हाला सांगितले. माझा मुलगा साधा आहे. पण हे कसं काही झालं, त्यालाच माहिती नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.

    डॉ. कुरुलकर यांच्याशी संबंध नाही

    डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले होते. त्यातूनच निखिल शेंडे यांचे नाव जोडले जात आहे. त्यावर निखिलचे काका म्हणाले, ‘आम्हालाही माहिती नाही हे कसं झालं. त्याला फसवलं गेलंय. निखिल निर्दोष आहे. हे काही मोठं प्रकरण नाही. फक्त चौकशीसाठी मोबाईल घेण्यात आल्याचे त्याने सांगितल्याचे निखिलच्या काकांनी सांगितले.