राज ठाकरे होणार का महायुतीमध्ये सामील ? खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष देत आहेत प्रस्ताव

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरे यांच्या महायुतीमध्ये सामील होण्याबाबत वक्तव्य केले आहे.

    लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यामध्ये राजकीय हालचाली वेगाने होत आहेत. महायुतीमध्ये आणखी कोण कोण सामील होणार याकडे सर्वजण आश्चर्याने पाहत आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. अनेक भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या महायुतीमध्ये सामील होण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरे यांच्या महायुतीमध्ये सामील होण्याबाबत वक्तव्य केले आहे.

    मनसेचा योग्य सन्मान करणे आमचं कर्तव्य

    नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंबाबत मत व्यक्त केले. बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे आमचे मित्र असून त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी नाही. गुढीपाडव्याला होत असलेल्या मेळाव्यात राज ठाकरे चांगला निर्णय करतील असा विश्वास आहे. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा योग्य सन्मान करणे आमचा कर्तव्य आहे, आवश्यक नाही की एखादी जागा किंवा एखादी जागा मिळालीच पाहिजे. ही विचाराची लढाई आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आमच्या सोबत येतील, असे सूचक वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

    महाराष्ट्र विकासासाठी मोदींना साथ

    महाराष्ट्र आणि देशाच्या विकासासाठी मोदींच्या संकल्पाला साथ म्हणून राज ठाकरे यांनी महायुतीला साथ द्यावी. जागा वाटपाचा तिढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार एकत्र मिळून सोडवतील, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारी रामटेक येथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरु असून १७ एप्रिल रोजी पुन्हा एकदा दिवाळी साजरी होईल. यंदाची रामनवमी महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. असे देखील बावनकुळे म्हणाले आहेत.