कारसेवा ते पाकसेवा! प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर बनवणार हजारो किलोंचा शिरा, करणार विश्वविक्रम

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनावेळी नागपूरमधील शेफ विष्णू मनोहर हे शिरा बनवण्याचा विश्वविक्रम करणार आहे. हजारो किलोंचा शिरा भक्तांना देण्यात येणार आहे.

  नागपूर : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळ्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी जगभरातून मान्यवर येणार असून अनेक देशातून खास भेटवस्तू येत आहेत. प्रभू श्री रामासाठी (Lord Shri Ram) प्रत्येक राज्य योगदान देत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र देखील मागे नाही. राज्यातील नागपूरमधील (Nagpur) सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) हे अयोध्येमध्ये (Ayodhya) विश्वविक्रम (World record) करणार आहेत.

  नागपूरमधील लोकप्रिय शेफ विष्णू मनोहर यांनी स्वतःच्या पाककलेने अनेक विक्रम आपल्या नावी नोंदवले आहे. त्याच्यामध्ये आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. प्रभू राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर शेफ विष्णू मनोहर तब्बल 7000 किलो शिरा बनवून विक्रम करणार आहेत. प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणाऱ्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे.

  शिरा तयार करण्याची जय्यत तयारी आता पासून सुरु करण्यात आली आहे. या शिऱ्यासाठी प्रचंड आकाराची खास सर्जिकल स्टीलची कढई सध्या नागपुरामध्ये तयार केली जात आहे. या कढईचे विविध मंदिरात विशेष पूजनही केले जाणार आहे. त्यानंतर शेकडो किलो वजनाची ही कढई लवकरच अयोध्येच्या दिशेने रवाना केली जाईल. त्याचबरोबर या उपक्रमासाठी लागणारे विविध पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणातून अयोध्येत आणले जाणार आहे.

  हा विश्वविक्रम करणारे शेफ विष्णू मनोहर यांनी या उपक्रमाबाबत अधिकची माहिती दिली आहे. याबद्दल बोलताना विष्णू मनोहर म्हणाले, “राम हलवा तयार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ तीन तासांचा कालावधी लागणार आहे. आम्ही सकाळी 6 वाजता हलवा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करू. त्यानंतर, आम्ही त्यातील नैवेद्य म्हणून भगवान रामाला देऊ. मंदिर आणि शहरातील भक्तांमध्ये स्वयंसेवकांमार्फत हा प्रसाद वितरित केला जाईल. 24 ते 26 जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात येणार आहे. शिऱ्यासाठीचा खास रवा नागपुरातून जाणार आहे, तर खास तूप तिरुपतीवरून आणले जाणार आहे. शिऱ्यात टाकला जाणारा सुकामेवा काश्मीरमधून आणण्यात येईल. हा विक्रम माझा वैक्तिक नसेल, तर तो प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेतूनच हाती घेतला आहे” अशी प्रतिक्रिया शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.

  तसेच शेफ विष्णू मनोहर यांनी कारसेवेच्या देखील आठवणींना उजाळा दिला. “मी यापूर्वी अयोध्येत कारसेवेसाठी गेलो होतो. आता पाकसेवेसाठी जाणार आहे. माझ्यासाठी ही फार भाग्याची गोष्ट” असल्याचे शेफ विष्णू मनोहर यांनी नमूद केले.

  लागणार शेकडो किलो सामान

  हा शिरा तयार करण्यासाठी 700 किलो रवा,  700 किलो तूप,  1120 किलो साखर,  1750 लीटर दूध,  1750 लीटर पाणी, 21 किलो इलायची पावडर,  21 किलो जायफळ पावडर, 100 डझन केळी,  50 किलो तुळशीची पाने,  300 किलो काजू, किसमिस व बदाम आदी साहित्य लागणार आहे.