मविआमध्येही नाराजीचा सूर! नाना पटोले यांनी दिला ठाकरे गट व शरद पवार गटाला इशारा

महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेला कॉंग्रेस पक्ष जागावाटपावरुन नाराज असल्याचे दिसून येत आहे.

    मुंबई – लोकसभा निवडणूकीचे वारे देशभरामध्ये वाहू लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपावर अद्याप चर्चा सुरु असून नाराजीचा सूर दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेला कॉंग्रेस पक्ष जागावाटपावरुन नाराज असल्याचे दिसून येत आहे. सांगली आणि भिवंडीची उमेदवारी जाहीर करताना नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही अशी तक्रार नाना पटोले यांनी केली आहे.

    नाहीतर त्याचे परिणाम होतील

    सांगली आणि भिवंडीची लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन नाना पटोले यांनी आपली नाराजी उघड केली. सांगली आणि भिवंडीत काही करू नका, नाहीतर तिकडे त्याचे परिणाम होतील असे आधीच बैठकीत आपण सांगून आलो होतो. त्यानंतरही भिवंडीत शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केला अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली. नाना पटोले म्हणाले, “महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनही पाळला जात नाही. आम्ही हायकमांडला प्रस्ताव दिला आहे. ते जे सांगितले ते आम्ही मान्य करू. पश्चिम महाराष्ट्रातील दोन जागा आणि मुंबईतील एका जागेचा प्रश्न होता. हा प्रश्न सामोपचाराने सोडवायला हवा होता. परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. यावर विचार करावा,” असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

    पुढे पटोले म्हणाले, “विदर्भात आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळून घेतले. परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात वेगळे निर्णय घेतले जात आहेत. अशा पद्धतीने उमेदवार जाहीर केल्यास कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होतो. याचा परिणाम संपूर्ण राज्यातील निवडणुकीवर होण्याचा धोका असल्याचा इशारा” नाना पटोले यांनी दिला. “तसेच वंचितसोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत. दोन जागा देण्याची तयारी आहे. माझा अधिकार वापरून दोन जागा देण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. मतविभाजन करू नका, अशी माझी विनंती आहे” असे आवाहन देखील नाना पटोले यांनी केले.