आयुष्यमान भारत योजनेत नागपूर ‘एक पाऊल पुढे’; आत्तापर्यंत काढले सुमारे 6 लाख कार्ड

सरकारी आरोग्याच्या सुविधा शहरासोबतच गाव खेड्यामधील गरिबांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या काळात आयुष्यमान भवः अभियान राबविले जात आहे.

    नागपूर : सरकारी आरोग्याच्या सुविधा शहरासोबतच गाव खेड्यामधील गरिबांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या काळात आयुष्यमान भवः अभियान राबविले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या अभियानातून आयुष्यमान ओळखपत्र वितरीत केले जात आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी देखील केली जात आहे.

    जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत सुमारे 14 लाखांहून अधिक लाभार्थी असून, आजवर जिल्ह्यात 5 लाख 91 हजारापेक्षा जास्त नागरिकांचे 6 आयुष्मान भारत योजनेंतर्गत गोल्डन कार्ड काढण्यात आले आहे. केंद्र सरकारने आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य विमा योजना सुरू केली आहे. त्या योजनेचाच भाग म्हणून राज्यात सुधारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली आहे.

    राज्यात ‘आयुष्मान’ भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी सुरूवात झाली आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक घेऊन योजने संबंधी सूचना केल्या. विशेष म्हणजे, या कार्डसंदर्भातील जबाबदारी प्रत्येक विभाग प्रमुखांकडे सोपविली गेली आहे. जिल्ह्यात योजनेचे 14 लाख लाभार्थी असून, त्यापैकी 5 लाख 91 हजारांवर कार्डाचे वितरणही झाले आहे.

    महिन्याभरातच 2.57 लाख कार्ड

    आयुष्यमान योजनेत नागपूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गेल्या 30 दिवसांचा विचार केल्यास जिल्ह्यात 2 लाख 57 हजार कार्ड काढले गेले. तर 7 दिवसांमध्ये दिवाळीच्या सुट्यात 40 हजार कार्ड काढल्याची माहिती प्रशासनाने दिली.