संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

राज्यभरात एसटीचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर अभियान सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एसटीच्या अमृत महोत्सवात एसटी बसस्थानके, बसेस स्वच्छ, सुंदर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

    नागपूर : राज्यभरात एसटीचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर अभियान सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एसटीच्या अमृत महोत्सवात एसटी बसस्थानके, बसेस स्वच्छ, सुंदर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यभरात या अभियानास जोरदार सुरु असून, सर्वेक्षण झालेल्या राज्यातील 563 बस स्थानकापैकी 212 बस स्थानक ही 50 पेक्षा कमी गुण मिळवून असमाधानकारक स्वच्छतेमध्ये समाविष्ट झाली आहे. तर, 351 बसस्थानकेही 50 पेक्षा जास्त गुण मिळवून चांगली स्वच्छता राखण्यामध्ये यशस्वी झाल्याचे समोर आले.

    राज्यातील 31 विभागापैकी चकाचक बसस्थानकाच्या यादीत विदर्भातील नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, अमरावतीचाही समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागात सर्वच्या सर्व बसस्थानके ही चांगले गुण प्राप्त करून स्वच्छतेच्या मार्गावर प्रगतीपथावर असल्याचे सकारात्मक बाब दिसून आली आहे. तसेच विशेष बाब म्हणजे, मुंबईतील 6 बस स्थानकांपैकी 5 बस स्थानके स्वच्छतेत अव्वल ठरली आहेत.

    या अभियानाअंतर्गत बस स्थानक स्वच्छता व सुशोभिकरणाला 35 गुण, प्रसाधनगृह स्वच्छतेला 15 गुण, बसेस च्या स्वच्छतेला 25 गुण व प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा-सुविधांना 25 गुण असे 100 गुण निर्धारित करण्यासाठी आले आहेत.

    एकूण गुणापैकी 50 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारी बस स्थानके ही चांगल्या दर्जाची अथवा स्वच्छता अभियानामध्ये प्रगतिशील बसस्थानक म्हणून ओळखले जातात. तर 50 पेक्षा कमी गुण मिळालेल्या बस स्थानकांची स्वच्छता ही असमाधानकारक असल्याचे शेरे संबंधित समितीने ओढले आहेत.