Namdevrao Jadhav accuses Sharad Pawar
Namdevrao Jadhav accuses Sharad Pawar

  मराठा आरक्षणावरू राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा ९ दिवस उपोषण केले होते. मंत्रिमंडळाच्या शिष्टाईनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरुच आहे. अशात जिजाऊंचे वंशज असलेल्या नामदेवराव जाधव यांनी मराठा समाजावर शरद पवारांनी अन्याय केला असे म्हटले आहे. तसेच एक गंभीर आरोपही त्यांच्यावर केला आहे.

  काय म्हटले आहे नामदेवराव जाधव यांनी?
  शरद पवार मराठा आरक्षणावर कधीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत. जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे येतो तेव्हा मुस्लिम समाजाला आरक्षण दिले पाहिजे, यांना आरक्षण दिले पाहिजे, त्यांना आरक्षण दिले पाहिजे म्हणतात. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या, असे ते कायम का म्हणतात? मराठा समाजाचे म्हणणे आहे जो आमचा हक्क आहे तो आम्हाला द्या.

  ….आणि मराठ्यांचीच जिरवली

  आम्हाला कुणाच्या हक्कांवर गदा आणायची नाही. ज्यावेळी शालिनीताई पाटील या विषयावर आक्रमक झाल्या होत्या, तेव्हा शरद पवारांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा तात्विक, वैचारिक आणि कायदेशीर विरोध शरद पवारांनी केला. आमचे दुर्दैव हे आहे की शरद पवारांनी मराठा म्हणून सगळीकडे मिरवले आणि मराठ्यांचीच जिरवली.

  ….आणि मराठ्यांचे नुकसान केले

  इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये जेव्हा बातम्या येत तेव्हा स्ट्राँग मराठा मॅन असे मथळे यायचे. दिल्लीत मराठा म्हणून मिरवायचं आणि महाराष्ट्रात मराठा म्हणून मराठ्यांची जिरवायची हे दुटप्पी वागणे आहे. व्ही. पी. सिंग यांना मंडल आयोगाचं श्रेय जाणार होते त्याआधी घाईने हा निर्णय शरद पवारांनी घेतला आणि मराठ्यांचे नुकसान केले, असा आरोप नामदेवराव जाधव यांनी केला.

  मराठ्यांना निकष का लावले जात आहेत?
  “मराठा समाजाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. आत्महत्या करणारे तरुण हे मराठा समाजातलेच सर्वाधिक आहेत. यापेक्षा कुठला निकष अजून सरकारला हवा आहे? आमच्यातले काही लोक पुढारलेले आहेत. पण, जे पुढारलेले आहेत ते पुढारीच आहेत. त्यांच्याकडे पाहून संपूर्ण गावाचं मॅपिंग करु शकत नाही.

   

  आम्हाला निकषांच्या चौकटीत अडकवलं जातं आहे कारण आरक्षणाची बस फुल झाली आहे. त्यात जागाच नाही. मात्र हे दिसू नये म्हणून काळ्या काचा लावल्या गेल्या आहेत. लोकांना वाटलं पाहिजे म्हणून तिकिटं काढा, रांगेत उभे राहा या सगळ्या औपचारिकता केली जाते आहे असंही नामदेवराव जाधव यांनी म्हटलं आहे.” एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप नामदेवराव जाधव यांनी केला.

  शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घालवले

  “शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घालवले. जे मराठे यादीत १८१ क्रमांकावर होते त्यावर फुली मारली गेली आणि १८२ क्रमांक तसेच १८३ क्रमांकावर अनुक्रमे तेली आणि माळी होते. त्यांना आरक्षणात घेतले गेले. ओबीसींची पहिली यादी जेव्हा तयार झाली त्यात १८० जाती होत्या. सुधारित यादीत १८१ क्रमांकांवर मराठा, १८२ क्रमांकावर तेली तर १८३ ला माळी होते. मग क्रमांक १८१ गायब कसा झाला? जे आरक्षण ११ टक्के होते ते १४ टक्के झाले तेव्हा लेव्हा पाटील, लेव्हा कुणबी आणि लेव्हा पडीदार या तीन जातींचा समावेश केला तेव्हा त्यांची कुठली कागदपत्रे घेतली गेली होती? कोणते आर्थिक किंवा सामाजिक निकष सिद्ध झाले होते? शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे आरक्षण १४ वरून २७ टक्क्यांवर नेले मात्र त्यावेळी मराठ्यांना डावलून तेली आणि माळी या दोन जातींचा समावेश केला.

  शरद पवार यांनी मराठ्यांचे भविष्य गाडून टाकले

  पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी शरद पवारांनी मराठ्यांचे भविष्य गाडले
  “शरद पवारांनी हा निर्णय नेमक्या कोणत्या दबावाखाली घेतला? त्यांच्यापुढे कोणत्या अडचणी होत्या? केंद्रात मंडल आयोग लागू होत होता, त्यावेळी व्ही. पी. सिंग भारताचे पंतप्रधान झाले होते. त्यांनी त्यांच्या आधी पुरोगामी निर्णय घेतला हे दाखवण्यासाठी शरद पवार यांनी मराठ्यांचे भविष्य गाडून टाकले. आता यावर हे सांगितलं जाते आहे की त्या GR वर शरद पवारांची मुख्यमंत्री म्हणून सही नाही, राज्यपालांची सही आहे. मात्र जेव्हा कुठलाही जीआर निघतो तेव्हा त्यावर राज्यपालच सही करतात मुख्यमंत्री नाही. ” असेही नामदेवराव जाधव यांनी स्पष्ट केलं.