नामदेवराव जाधव बारामती लोकसभा लढवणार; शिवरायांकडून दृष्टांत झाल्याचा केला दावा

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ज्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले होते, त्या नामदेव जाधवांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. हे जाहीर करताना छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन आपल्याला निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

    पुणे : शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ज्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले होते, त्या नामदेव जाधवांनी (Namdevrao Jadhav) बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. हे जाहीर करताना छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन आपल्याला निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. त्याचबरोबर मागील जन्मात आपण लखुजी जाधवराव होतो, असेही नामदेव जाधव म्हणालेत.

    एवढेच नाही तर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडले. त्या पद्धतीने आपल्यालादेखील जमिनीखाली गुप्तधन सापडेल, असे नामदेव जाधव यांनी सांगितले. या सगळ्या दाव्यांमुळे तुमच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल कारवाई होऊ शकते का? असे विचारल्यावर आपण कोणत्याही कारवाईला घाबरत नसल्याचे नामदेव जाधव म्हणाले आहेत.

    मी निवडणूक लढवावी अशी अनेकांची इच्छा

    बारामतील मतदारसंघ हा शहाजी राज्यांच्या जाहगिरीचा प्रदेश आहे. शिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या निर्मितीचे केंद्रबिंदू आहे. इथेच शिवाजी महाराजांनी शपथ घेतली आहे. पहिला किल्ला ताब्यात दिलेला तोरणा किल्लादेखील इथेच आहे. संभाजी महाराजांचा जन्मस्थळ असलेला पुरंदर किल्लादेखील याच मतदारसंघामध्ये आहे.

    यातील कोणत्याही किल्ल्यांचा विकास झालेला नाही. या किल्ल्यांचा विकास व्हावा, अशी इच्छा आहे. त्यात मी निवडणूक लढावी अशी इच्छादेखील अनेकांनी बोलून दाखवली आहे. मला पहाटे शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असलेल्या दिवशी म्हणजेच ३ एप्रिलला दृष्टांत झाला. छत्रपत्री शिवाजी महाराजांनी स्वप्नात येऊन निवडणूक लढवण्याचा दृष्टांत दिला, असा दावा केला आहे.