
पुणे : मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधव यांना काळं फासण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं आहे. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळेच हे कृत्य केल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट इथं कार्यक्रमासाठी जाताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याचं सांगितलं जात आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभर पेटत असताना, शरद पवारांवर जातीच्या दाखल्यावरून बोलणारे नामदेवराव जाधव यांना आज काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून याची जबाबदारी घेण्यात आली आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, आम्ही याअगोदर नामदेवरा जाधवांना इशारा दिला होता. आमच्या मोठ्या आणि वरिष्ठ नेत्यावर बोलताना त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. पुराव्यासह त्यांनी बोलायला पाहिजे उगाच बोलू नये, त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वीच त्यांना इशारा दिला होता. परंतु, याकडे त्यांनी दुर्लक्ष करीत सतत आरोप करीत राहिले. त्यामुळे आम्ही आता त्यांना काळे फासत त्यांचा निषेध केला आहे.