
बीड तालुक्यातील एका 27 वर्षीय महिलेचा विवाह 2019 साली झाला होता. तिचे लग्न घाटकोपर येथे ठरले होते. त्यामुळे तिला गुरू आई असलेल्या महिलेने गडंगन खायला बोलावले होते. याच जेवणात गुंगीचे औषध टाकण्यात आले.
बीड : अंधश्रद्धेचा कळस म्हणावी अशी एक घटना बीडमध्ये घडली. पती, सासरा, दिरासह सात जणांनी एका 27 वर्षीय विवाहितेला विवस्त्र करून मासिक पाळीचे रक्त घेतले. तसेच तीन दिवस तिला उपाशीपाेटी ठेवून छळ केला. पीडित विवाहितेने माहेरी गेल्यानंतर पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) याबाबत तक्रार दिली आहे. महिलादिनी दाखल झालेल्या या गुन्ह्याने राज्यात खळबळ उडाली आहे.याविषयी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
देशात पाहिलं तर भाजपा बागेश्वर धाममधल्या धीरेंद्र शास्रींवर कारवाई करत नाही. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे. राज्यात जेव्हापासून भाजपची सत्ता आल्यापासून जादूटोण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळेच मासिक पाळीचं रक्त विकून ते जादुटोण्यासाठी वापरण्याचा प्रकार घडला आहे. हे महाराष्ट्रासारख्या राज्याला काळिमा फासणारे आहे,असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
विज्ञान युग वाढत असताना समाजात भयंकर अंधश्रद्धा वाढत आहेत. अशा गोष्टी करताना लोकांना कायद्याची भीती वाटायला हवी. त्यामुळे पुणे पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना कडक कलमं लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
नक्की काय घडलं ?
बीड तालुक्यातील एका 27 वर्षीय महिलेचा विवाह 2019 साली झाला होता. तिचे लग्न घाटकोपर येथे ठरले होते. त्यामुळे तिला गुरू आई असलेल्या महिलेने गडंगन खायला बोलावले होते. याच जेवणात गुंगीचे औषध टाकण्यात आले. त्याच रात्री तिच्याशेजारी सध्याचा पती असलेल्या मुलाला झोपवले. त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि घाटकोपरच्या नियोजित वराला पाठविला. या प्रकरणात पीडिता तक्रार देण्यासाठी गेली; परंतु गुरू आईने माफी मागत हे प्रकरण मिटवले, तसेच ज्याच्यासोबत व्हिडिओ बनवला, त्याच्यासोबत लग्न लावून दिले; परंतु त्याचे अगोदरच एक लग्न झाल्याचे पीडितेला सासरी आल्यावर समजले. तिने याबाबत विचारणा केल्यावर तिला धमकावण्यात आले.
पीडितेने कौटुंबिक न्यायालयात प्रकरणही दाखल केले. न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर हेच नातेवाईक तिच्या पाया पडले. माफी मागत हे प्रकरण मिटवून घेण्यास सांगितले. त्यानंतर जुलै 2022 मध्ये पीडिता सासरी आली; परंतु सासू, सासरा यांच्याकडून तुझा नवरा काहीच कमावत नाही, त्यामुळे तुला खायला देणार नाही, असे म्हणत तिला त्रास देऊ लागले. ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 च्या दरम्यान दीराने मासिक पाळी सुरू असताना रक्त दे, असे म्हणत मारहाण केली. पीडितेने नकार दिल्याची माहिती इतरांना दिली. त्यानंतर पीडितेला सर्वांनीच एका खोलीत बांधून ठेवत अघोरी कृत्य केले. तिला तीन दिवस उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. हा अन्याय असह्य झाल्याने पीडितेने माहेर गाठले. तिथे आईच्या मदतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांना आपली व्यथा सांगितली. त्यानंतर पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात पती, सासरा, सासू, दिरासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता हाच गुन्हा झीरोने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.