nana patole and ajit pawar

कधी कधी तुम्ही आनंदाने काम करता, कधी तुम्हाला नाइलाजास्तव काम करावं लागतं. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं. पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितलं म्हणून नाइलाजास्तव काम केलं, असं अजित पवार म्हणाले.

  मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदार जाणार असल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यात चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी या सर्व चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलं. तसेच जिवंत असेपर्यंत राष्ट्रवादीचंच काम करत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्याबाबतच्या चर्चा काही थांबलेल्या नाहीत. अजित पवारांनी एका मुलाखतीत जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं कबूल केलं आहे. तसेच 2024मध्येच का? आता देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  145 आकडा असेल तर अजित दादांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे -नाना पटोले 
  राजकारणात असताना मुख्यमंत्री व्हावे असं वाटलं तर त्यात गैर काय आहे? 145 आकडा असेल तर अजित दादांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पटोले म्हणाले, अजित दादांच्या मनात काय आहे. त्याबद्दल मी काय बोलणार? राजकीय स्फोट होणार असं म्हटलं जातंय. एकदा लोकशाहीचा स्फोट झाला तर काय? दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले मी राष्ट्रवादीतच राहणार, आता पुन्हा ते जाणार अशी चर्चा सुरू झाली, असं नाना पटोले म्हणाले.

  पृथ्वीराज बाबांच्या वेळेस नाईलाजाने केलं काम -अजित पवार
  दरम्यान अजित पवार यांनी या मुलाखतीत अजित पवारांना उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काम करतानाचा तुमचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, दोघांनाही आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता, चव्हाण यांना केंद्रात काम करण्याचा अनुभव होता. पण कधी कधी तुम्ही आनंदाने काम करता, कधी तुम्हाला नाइलाजास्तव काम करावं लागतं. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं. पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितलं म्हणून नाइलाजास्तव काम केलं, असे अजित पवार म्हणाले.

   पृथ्वीराज चव्हाणांबाबत असं बोलणं चुकीचं – नाना पटोले
  नाईलाज हा शब्द का वापरत आहात? मग तुम्ही शपथ घ्यायला नव्हती पाहिजे. तुम्ही पदावर बसून खदखद निर्माण करण्याऐवजी पद सोडून तुम्ही बोलायला हवं होतं. पृथ्वीराज बाबांविषयी अजित पवार बोलतील ही अपेक्षा नव्हती. पृथ्वीराज चव्हाणांबाबत असं बोलणं चुकीचं आहे. ते खुर्चीवर बसलेले असताना तुम्हाला असं वाटत होतं तर त्यावेळीच सोडून जायला हवं होतं. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

  अजित पवार यांच्या पृथ्वीबाबांविषयीच्या वक्तव्यामुळे नाना पटोले संतापले आहेत. त्यांनी अजित पवार यांनी असं वक्तव्य करणं बरोबर नाही म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यात नाना पटोले विरूद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळणार का? हा प्रश्न चर्चेत आहे.