
माझ्याकडे खूप मसाला वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार. मी परवापण सांगितलं, हे जास्त पक्षाच्या अंगावर आणू नका. हा परिवारातला वाद आहे. हा जास्त अंगावर आणला तर माझ्याकडे खूप मसाला आहे. मला त्या लेव्हलला जाऊ देऊ नका, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. आपण सत्यजीत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणार नाही. त्याबाबत आमचे प्रवक्ते उत्तर देतील, असं नाना पटोले म्हणाले. पण त्यानंतर त्यांनी सत्यजीत तांबे यांना मोठा इशारा दिला. “भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जो संदेश आम्हाला द्यायचा आहे, आम्हाला सर्वांना जोडून घ्यायचं आहे. पण जे कुणी इकडे तिकडे दोन्हीकडे हात ठेवून चालतात त्या लोकांचा सगळा मसाला आमच्याकडे आहे. मला आज त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. प्रवक्त्याला त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. लोकांपर्यंत वस्तुस्थिती जायला पाहिजे”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
“आमचे प्रवक्ते त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देणार आहेत. अखेर कुणाबद्दल काय बोलावं, याचे नियम असतात ना? आमचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. मी सगळंच, सगळ्यांचं ऐकतोय. मी राज्यात काँग्रेसचा प्रमुख आहे. विरोधकांचं ऐकावं लागतं, स्वत:च्या लोकांचं देखील ऐकावं लागतं. सगळ्यांचं ऐकावं लागतं. त्यामुळे आम्ही सर्वांचं ऐकतो”, असं नाना पटोले म्हणाले.
“योग्यवेळी योग्य उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे कुणी काहीही ओरडलं किंवा बोललं तर त्यावर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं काही माध्यमांना किंवा गोदी मीडियाला सांगून ठेवलं असेल तर मला माहिती नाही. पण आमचे प्रवक्ते त्यावर उत्तर देतील”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
“मी विखेंच्या बद्दल काही दिवसांनी बोलणार आहे. मी एकदम पद्धतशीर बोलणार आहे. आता आमच्या मित्राच्या मागे लागले आहेत. माझे मित्र कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस आहेत. आता त्यांची जागा हे घ्यायला पाहत आहेत. मी विखेंवर बोलत नाहीत. नंतर उत्तर देतो”, असा इशारा त्यांनी दिला.
“ज्या लेव्हलवर आम्हाला बोलायचं आहे त्या लेव्हलवर आम्ही बोलू. नाशिकमध्ये जो काही सर्वपक्षीय हाय व्होल्टेज झालाय ते सगळ्यांना माहिती आहे. आमचे प्रवक्ते सर्व पुरव्यांनिशी माहिती देतील. त्यावर त्यांनी बोलावं”, असं नाना पटोले म्हणाले.
“माझ्याकडे खूप मसाला वेळ आल्यावर सगळं बाहेर काढणार. मी परवापण सांगितलं, हे जास्त पक्षाच्या अंगावर आणू नका. हा परिवारातला वाद आहे. हा जास्त अंगावर आणला तर माझ्याकडे खूप मसाला आहे. मला त्या लेव्हलला जाऊ देऊ नका, असा इशारा मी परवाही दिलेला आहे. मला तेवढं याच्यात नाही जायचंय”, असा इशारा पटोलेंनी दिला.