अवकाळी पावसातही नंदुरबारच्या शेतकऱ्याने केली यशस्वी शेती, वांग्यातून कमवले लाखो रुपये

    नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यात सातत्याने होणारा अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र, या सर्व संकटांवर मात देत नंदूरबार तालुक्यातील विजय माळी या शेतकऱ्याने वांग्यांची यशस्वी शेती करून दाखवली आहे. शेतीमध्ये योग्य पाण्याचे, खताचे नियोजन आणि मेहनत केली की सर्व शक्य असते, याचे उत्तम उदाहरण नंदुरबार शहरातील माळीवाडा येथे राहणाऱ्या विजय माळी या शेतकऱ्याने आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर मेघना या वांग्यांच्या वाणाची लागवड केली होती. यासाठी त्यांनी एक लाख तीस हजार रुपये खर्च करून आतापर्यंत अडीच लाखांपर्यंचे उत्पन्न घेतले आहे. अजून एक लाखाचे वांगे विकण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्याने केलेला खर्च वजा करता, एक लाख ५० हजार निव्वळ नफा निघणार आहे.
    भाजीपाल्याला जास्त मागणी
    नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही, यासाठी भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस, अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. परंतु भाजीपाल्याच्या शेतीसाठी योग्य पाण्याची आणि वेळेवर खतांची फवारणी केल्याने याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतो. नंदुरबार बाजारपेठेत वांग्याला १२ ते १५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत आहेत. तर बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीचा खर्च कमी लागत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. शेती परवडत नाही असे अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. परंतु योग्य नियोजन राहिले तर लाखो रुपयांचा नफा भाजीपाल्याच्या शेतीतून मिळू शकतो.