नरहरी झिरवळ नक्की कोणात्या गटात? शरद पवार गटासोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर दिले स्पष्टीकरण

झिरवळ हे अजित पवार गटामध्ये असताना त्यांचे शरद पवार यांच्या बैठकीत सामील झालेले फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतर नरहरी झिरवळ यांनी स्वतः त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

    दिंडोरी : लोकसभा निवडणूकीमध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये धूसफूस सुरु आहे. भाजपच्या डॉ. भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यामध्ये लढत होणार आहे. तिसगाव येथे भगरे यांच्या प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्याचवेळी गावातील मंदिराच्या कामाचा शुभारंभ होणार होता. शरद पवार गटाची बैठक सुरू असताना नरहरी झिरवळ तिथे दाखल झाले. बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. झिरवळ हे अजित पवार गटामध्ये असताना त्यांचे शरद पवार यांच्या बैठकीत सामील झालेले फोटो व्हायरल झाल्यानंतर सर्वांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतर नरहरी झिरवळ यांनी स्वतः त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

    नरहरी झिरवळ यांनी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. झिरवळ म्हणाले, “जी काही क्लिप व्हायरल होतेय, भगर सर आणि मी एकाच मंचावर उपस्थित होतो आणि मी तुतारीचा प्रचार करतो ही बातमी पसरवली गेली. त्याची खरी कहाणी अशी आहे की, कुदळ मारायचा कार्यक्रम कोणाच्याही हाताने करा, मी तिथे उपस्थित राहीन, असं मी म्हणालो होतो. म्हणून मी तिथे उपस्थित होते, असे मत नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले.

    पुढे ते म्हणाले, तिथे गेल्यावर बसायला खुर्च्या होत्या. आदिवासी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष बागुल सर बसले होते, त्यांच्या बाजूला मी बसलो. आणि दुसरीकडे बघून मी बोलत होतो. तेवढ्यात बागूल सर उठले आणि तिथे भगरे येऊन बसले. त्यात कोणीतरी फोटो काढला आणि त्या मिनिटांत ते निघून गेले. असा संभ्रम निर्माण करून तेवढा मतदार आता खुळा नाही राहिला”, असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिलं.