कारागृहात नेलेल्या कैद्याकडे सापडले अमली पदार्थ; बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई

ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत तेथून अमली पदार्थांचे रॅकेट चालविणाऱ्या ललित पाटीलचे प्रकरण ताजे असतानाच शिवाजीनगर न्यायालयातून कारागृहात नेण्यात आलेल्या कैद्याकडे कारागृहाच्या प्रवेशद्वारात २५ ग्रॅम चरस सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई गेली आहे.

    पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत तेथून अमली पदार्थांचे रॅकेट चालविणाऱ्या ललित पाटीलचे प्रकरण ताजे असतानाच शिवाजीनगर न्यायालयातून कारागृहात नेण्यात आलेल्या कैद्याकडे कारागृहाच्या प्रवेशद्वारात २५ ग्रॅम चरस सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई गेली आहे. शुभम उर्फ बारक्या हरिश्चंद्र पास्ते असे आरोपीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पास्ते खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. ऑक्टोबर २०१७ पासून तो कारागृहात आहे. मंगळवारी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. पास्तेविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पास्तेला पुन्हा येरवडा कारागृहात नेण्यात आले. तेव्हा कारागृहातील प्रवेशद्वारात रक्षकांनी त्याची झडती घेतली. झडतीत त्याच्याकडे २५ ग्रॅम चरस सापडले.

    आता याप्रकरणात त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पास्तेची कारागृहात तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयात त्याला चरस दिल्याचा संशय आहे. पोलीस बंदोबस्तात त्याला चरस मिळाल्याने बंदोबस्तावरील पोलिसांवर संशयाची सुई वळाली आहे.

    कोर्ट कंपनीकडे जबाबदारी…

    न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून न्यायालयात नेण्यात येणाऱ्या कैद्यांना पोलीस बंदोबस्तात हजर केले जाते. यासाठी शिवाजीनगर मुख्यालयात एक कोर्ट कंपनी आहे. त्यांच्याकडे ही जबाबदारी असते. तसेच, रुग्णालयात देखील उपचार घेणाऱ्या कैद्यांच्या बंदोबस्तासाठीही कोर्ट कंपनीकडे जबाबदारी असते. आता कारागृहातून न्यायालयात व येथील सुनावणी आटोपल्यानंतर त्यांना पुन्हा कारागृहात सोडण्यात येते.