कोपरखैरणेत ३१ लांखांचे अंमली पदार्थ जप्त

कोपरखैरणेत ३१ लांखांचे अंमली पदार्थ जप्त, रहिवासी संकुलातून अंमली पदार्थ जप्त केल्याने विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले

    नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १९ मधील नॅशनल अपार्टमेंटमधून ६३ ग्रॅम एमडी तर २५३ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी एनडीपीएस सेलचे नीरज चौधरी यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत. त्याचे बाजार भाव तब्बल ३१ लाख ६० हजार आहे.

    नशा मुक्त नवी मुंबई या अंतर्गत नवी मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेत विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले जातात. अशातच औदुंबर पाटील यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्याची धुरा सांभाळताच सेक्टर ८ मधील बालाजी थिएटरच्या लगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये धाड टाकून गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले आहे. या टोळीकडे २० किलो गांजा जप्त करून ४ जणांना ताब्यात देखील घेतले होते.

    औदुंबर पाटील यांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. मात्र कोपरखैरणे सेक्टर १९ मधील नॅशनल सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर एमडी व ब्राऊन शुगर नमक शरीरासाठी हानिकारक असे अंमली पदार्थ विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर एनडीपीएस सेलचे नीरज चौधरी यांच्या मदतीने नॅशनल सोसायटीत धाड घालून ६३ ग्रॅम एमडी ड्रग्स आणि २५३ ग्रॅम ब्राऊन शुगर असे एकूण ३१ लाख ६० हजारांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईत २ महिला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील मुख्य महिला सूत्रधार तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली आहे. त्यांच्या जवळून १२ हजार ९८० रुपयांची रोख रक्कम आणि दोन मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत.