narendra patil

नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांना पुन्हा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान करून राज्यातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपा (BJP) व शिंदे गटाने (Shinde Group) राजकीय दृष्ट्या सहकार क्षेत्र व मराठा समाजाला आपल्याकडे घेण्याची महत्वाची खेळी खेळली आहे.

  सिद्धेश प्रधान नवी मुंबई : नुकत्याच झालेल्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांना पुन्हा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केले. त्यास मुख्यमंत्र्यांनी देखील होकार देत आपल्या भाषणात त्याबाबत घोषणा केली. नरेंद्र पाटील यांना पुन्हा अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान करून राज्यातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपा (BJP) व शिंदे गटाने राजकीयदृष्ट्या सहकार क्षेत्र व मराठा समाजाला आपल्याकडे घेण्याची महत्वाची खेळी खेळली आहे. त्याचा आगामी निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाला राजकीयदृष्ट्या फायदाच होण्याची शक्यता आहे.

  राष्ट्रवादी सोडत भाजपाची कास धरून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळवले होते. मात्र भाजपाशी फारकत घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धक्के देताना आरे महामंडळांवरील नियुक्त्या रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असलेल्या मराठा समाजाशी निगडित असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ देखील समाविष्ट होते. मात्र देवेंद्र फडणवीसांना आपला नेता मानलेल्या नरेंद्र पाटील यांनी देखील पदावर न राहता आपला राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सोपवला होता.

  आजतागायत सहकार क्षेत्रावर कायम शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे व काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यात राष्ट्रवादी काकणभर सरसच राहिली आहे. सहकरी बँका, पतपेढ्या, जिल्हा बँका, साखर कारखाने यावर वर्चस्व ठेवत शरद पवारांनी राज्यभर आपले राजकारण केले आहे. त्यात नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठ ही राज्यातील सर्व बाजार पेठांची शिखर समिती राहिली आहे. त्यामुळे मुंबईला अन्न पुरवठा करणाऱ्या याबाजारपेठेचे देशासोबत, राज्यात देखील अतीव महत्व आहे.

  या बाजारपेठेद्वारे मराठा समाजावरदेखील राष्ट्रवादीने वर्चस्व राखलेले आहे. हीच नाळ ओळखत देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या काळात सहकार क्षेत्र काबीज करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मराठी समाजाचे व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना आपल्या बाजूने वळवले. त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊ केले. इतकेच नव्हे तर या पदाला कॅबिनेट दर्जा बहाल करण्यात आला. माथाडी मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली व ती सत्यात उतरविण्यात आली.

  नरेंद्र पाटील यांनी देखील फडणवीस यांना निराश न करता आपल्यावर दिलेली जबाबदारी तितक्याच खंबीरपणे पेलली. सोबत बँक अधिकारी घेऊन राज्यातील तालुके पिंजून काढले. अनेक तरुणांना कर्जे बहाल केली. अशा तरुणांनी त्यातून उद्योग उभारले. थोडेथोडके नव्हे तर तब्बल ५० हजार युवकांना कर्जे देण्यात आली. त्यातून उद्योजक घडले. त्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच संघटनेत राहून कायम आ. शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांच्यात छुपे युद्ध पाहण्यास मिळाले आहे. शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना कायम ताकद दिल्याने राष्ट्रवादीला मानणारा वर्ग माथाडी व मराठा समाजात अधिक आहे. त्यात नवी मुंबईत वसलेल्या व एपी एम सी शी संलग्न असणाऱ्या लाखो नागरिक हे सातारा, सांगली, पुणे येथील असल्याने त्यावर कायम राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. हीच बाब ओळखत फडणवीस यांनी मराठ समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी मराठा नेत्यांसह सहकार क्षेत्र आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

  नरेंद्र पाटील यांच्या रूपात सबंध एमएमआरमध्ये वसलेला मराठा समाजाचा असलेल्या माथाडी कामगार आपलासा करण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यातूनच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ देऊन नरेंद्र पाटलांच्या रूपाने फडणवीसांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या माथाडी कामगारांना कुरवळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात शिंदे व फडणवीस सरकार आल्यावर निर्णयांचा धुमधडाका लावला आहे. राज्यातील जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करत आहे. त्यात नरेंद्र पाटलांना महामंडळ देऊन पहिल्यापेक्षा अधिक ताकद देण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकार करणार आहे. त्यासोबत माथाडी कामगारांच्या १९ मग्ण्यांमधील अनेक मागण्या देखील पूर्ण करण्याचा शिंदे व फडणवीस सरकार प्रयत्न करणार आहे. त्यात माथाडी कामगारांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या घरांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुका पाहता व एपीएमसी काबीज करण्यासाठी शिंदे व फडणवीस सरकारने सध्या तरी नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपद देऊन मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला असून तो कितपत यशस्वी होतो ते पाहावे लागणार आहे.