नाशिक-बेळगाव विमानसेवा लवकरच पूर्ववत; आठवड्यातून दोन दिवस सेवा

माजीमंत्री छगन भुजबळ यांनी उडान योजनेंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमान सेवेसाठी नोंदणी पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली. ३ फेब्रुवारीपासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे.

    नाशिक – स्टार एअरने (Star Air) नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी (Nashik-Belgaon Airline Service) प्रवाशांची नोंदणी पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे ३ फेब्रुवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा पूर्ववत होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. उडान योजनेचा (Udan Scheme) तीन वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे आणि व्यावसायिक उड्डाणास प्रतिसादाअभावी एक नोव्हेंबरपासून अलायन्स एअरलाईन्सने (Alliance Airlines) नाशिक-पुणे आणि हैद्राबाद-नाशिक-अहमदाबाद-दिल्ली आणि स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमान सेवा बंद केली होती.

    माजीमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उडान योजनेंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमान सेवेसाठी नोंदणी पुन्हा सुरू केली असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली. ३ फेब्रुवारीपासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करणार आहे. त्यासाठी कंपनीने नोंदणी देखील सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या कंपन्यांच्या विमानसेवाही सुरू करण्यासाठी भुजबळ यांच्याकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.

    आठवड्यातून दोन दिवस या विमान सेवेचा लाभ मिळणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता बेळगावहून विमान निघून नाशिक येथे १०.३० वाजता पोहचेल. नाशिकहून सकाळी पावणेअकरा वाजता निघणारे विमान तासाभरात बेळगावला पोहचेल. रविवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी बेळगावहून निघणारे विमान सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी नाशिकला पोहोचेल. सायंकाळी साडेसहा वाजता नाशिकहून बेळगावकडे निघालेले विमान साडेसात वाजता तिकडे पोहोचणार आहे. या मार्गावर ५० सीटर एम्ब्रेअर १४५ विमान धावणार आहे.