महापालिकेच्या ‘पे अँड पार्किंग’चा लवकरच होणार श्रीगणेशा; शहरातील सात जागा झाल्या निश्चित

महानगरपालिकेने उत्पन्न वाढीसाठी मोबाईल टॉवरसाठी जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला असून, त्यापाठोपाठ आता मोकळ्या भूखंडावर 'पे अँड पार्किंग' (Pay and Park) सुरु करणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्यात 'ऑफ स्ट्रिट पार्किंग'अंतर्गत सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

    नाशिक : महानगरपालिकेने उत्पन्न वाढीसाठी मोबाईल टॉवरसाठी जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला असून, त्यापाठोपाठ आता मोकळ्या भूखंडावर ‘पे अँड पार्किंग’ (Pay and Park) सुरु करणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्यात ‘ऑफ स्ट्रिट पार्किंग’अंतर्गत सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या महिन्याच्या अखरेपर्यंत महापालिका स्वतःचे मनुष्यबळ कार्यरत करत ‘पे अँड पार्किंग’चा श्रीगणेशा करणार आहे. तसेच शहरातील एकूण १७ पार्किंग ठिकाणांसाठी धोरण निश्चित करणार आहे.

    करसंकलन व बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून व केंद्राकडून जीएसटी परताव्याची रक्कम येते. मात्र, यातील निम्मा खर्च अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. उर्वरीत रक्कमेतून दैनंदिन कामे व विकासकामासाठी ही रक्कम खर्चित होते. दरम्यान, विविध विकासासाठी निधी हवा असेल तर उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याच्या सक्त सूचना पंधराव्या वित्त आयोगाने दिल्या आहेत. यानंतर पालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढीचे पर्याय शोधण्याचे काम सरु केले आहे.

    मुख्य रस्त्यांवर लावली जातात वाहने

    शहरात पार्किंगची समस्या नवीन नाही. वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने मुख्य रस्त्यांवर वाहने लावली जातात. शहरात स्मार्ट सिटीकडून १७ ठिकाणी पार्किंग सुरु करण्यासाठी प्रयत्न होते. मात्र, मध्येच स्मार्ट सिटीने हा विषय सोडून दिला. महापालिका प्रशासन आता ज्या सतरा जागा आहेत. त्यापैकी अकरा जागा ‘ऑन स्ट्रिट’ तर उर्वरित सहा जागा ‘ऑफ स्ट्रिट’ आहेत.