जुनी पेन्शनच्या मागणीवर पालिका कर्मचारी आक्रमक; काळ्या फिती लावून कामकाज

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख राज्य स्तरावरील प्रलंबित मागणीसह इतरही मागण्यासाठी राज्यातील सर्व कामगार कर्मचारी संघटनांनी एकत्रितरित्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

    नाशिक : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख राज्य स्तरावरील प्रलंबित मागणीसह इतरही मागण्यासाठी राज्यातील सर्व कामगार कर्मचारी संघटनांनी एकत्रितरित्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास महानगरपालिका कामगार कर्मचारी कृती समितीचा पाठिंबा दिला असून, मंगळवारी (दि.12) काळ्याफिती लावून कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नासंदर्भात प्रशासनाचे कामगार प्रलंबित लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी १० मार्च २०२३ रोजी तत्कालीन आयुक्तांना महानगरपालिका कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने निवेदन दिले होते, त्यातील मागण्या आज ही प्रलंबितच आहेत. महानगरपालिका कामगार कर्मचारी कृती समितीची बैठक माजी नगरसेवक गुरुमित बग्गा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस महानगरपालिकेतील सर्व कामगार कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती माजी नगरसेवक तथा सीटूचे उपाध्यक्ष अॅड. तानाजी जायभावे यांनी दिली.

    आंदोलनास महानगरपालिका कामगार कर्मचारी कृती समितीचा पाठिंबा असून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. याबाबत महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्याही भावना तीव्र स्वरूपाच्या असून आपले मार्फत शासनापर्यंत पोहोचवण्यात याव्यात या मागणीचे निवेदन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना देण्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.