nashik crime

सध्या सोशल मीडियावर रिल्स (Reels) बनवून आपले फॅन फॉलोअर्स वाढविण्याकडे युवा वर्गाचा मोठा कल आहे. त्यामुळे दिवसभर कुठेतरी रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकण्यात युवा वर्ग दंग असतो.

    पंचवटी: नाशिकमध्ये (Nashik) हातात प्राणघातक शस्त्रे घेऊन इन्स्टाग्रामवर रिल्स बनविणाऱ्या दोघांना युनिट एकच्या पथकाने घातक शस्त्रांसह अटक (Arrest) केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे सोशल मीडियावर रिल्स (Reels) बनवणाऱ्या चमकोबाजी करणाऱ्याना चांगलाच पोलिसी हिसका बसला आहे. अशा प्रकारे घातक शस्त्रे बाळगू नये किंवा अशी हत्यारे बाळगणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून आपले फॅन फॉलोअर्स वाढविण्याकडे युवा वर्गाचा मोठा कल आहे. त्यामुळे दिवसभर कुठेतरी रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकण्यात युवा वर्ग दंग असतो. मात्र, असे करताना अनेकदा समाजात चुकीचा संदेश जाणारे रिल्स बनविले जात असल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्याने त्यांनी आपले लक्ष सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित केले होते.

    युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ आणि कर्मचारी मुक्तार शेख यांना गाेपनीय माहिती मिळाली की, काही युवक घातक शस्त्र बाळगुन त्याचे इन्स्टाग्राम वर रिल्स बनवून चमकोगिरी करीत आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीमखान पठाण, शरद सोनवणे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके, मुक्तार शेख यांनी संशयित फैजान नईम शेख (१९, रा. भारत नगर, नाशिक) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने एक स्टीलची धारदार तलवार पोलिसांच्या स्वाधीन केली.

    याबाबतच्या चौकशीत त्याने सदरची तलवार त्याचा मित्र सचिन शरद इंगोले (२८, रा. भारत नगर) याच्याकडून घेतल्याचे आणि त्याच्याकडे अजून घातक शस्त्र असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन इंगोले याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक धारदार लोखंडी गुप्ती हस्तगत केली आहे.