नाशिकमधील तडीपार गुंडाचा बारामतीत खून; पळून जाणारा आरोपी तासात जेरबंद

नाशिकमधून तडीपार असणारा, बारामती शहरातील हॉटेल मातोश्रीमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या गुंडाचा हॉटेल कर्मचाऱ्यानेच चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला एका तासात बारामती तालुका पोलीसांनी जेरबंद केले.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नाशिकमधून तडीपार असणारा, बारामती शहरातील हॉटेल मातोश्रीमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या गुंडाचा हॉटेल कर्मचाऱ्यानेच चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला एका तासात बारामती तालुका पोलीसांनी जेरबंद केले.

    गणेश प्रभाकर चव्हाण (रा. मालेगाव, जि. नाशिक) असे खून झालेल्याचे नाव असून, याप्रकरणी विकास दीपक सिंग (वय २९, मूळ रा. चंदीगड,पंजाब, सध्या रा. आमराई, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पंजाबकडे पळून जात असताना अटक केली आहे. त्या संदर्भातील माहिती पोलीस निरीक्षक महेश ढव्हाण यांनी दिली.

    माझ्या ताब्यातील किचनमध्ये पाय ठेवायचा नाही, असा दम गणेश प्रभाकर चव्हाण याने विकास दीपक सिंग याला दिला होता. त्यामुळे चिडून सिंग याने चव्हाण याच्यावर चाकूने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपी विकास सिंग हा पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह कोंडवे, साहेब फौजदार भागवत, ठाणे अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक रणजित मुळीक, पोलीस शिपाई प्रशांत राऊत, अमोल नरुटे आदींनी शोधमहीम सुरू केली. यावेळी बारामती शहरातील माळावरची देवी परिसरात संशयित आरोपी सिंग याला अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राहुल घुगे करत आहेत.

    बारामतीतील हॉटेल चालक व मालकांनी आपल्याकडे कामावर ठेवलेल्या कामगारांची सर्व माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. त्यांचे आधार कार्ड ठेवावीत, सदर कामगार गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत ना? याची खात्री करावी, अन्यथा हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात येईल.

    – महेश ढव्हाण, पोलिस निरीक्षक, बारामती तालुका पोलिस ठाणे.