नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावरील छापेमारी सूडबुद्दीने; नाना पटोले यांचा आरोप

आज ईडीनं नॅशनल हेरॉल्डच्या दिल्लीतील ऑफिसवर छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन आता काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

    मुंबई : काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रिंग आणि नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सलग चार दिवस चौकशी केल्यानंतर आता आज ईडीनं नॅशनल हेरॉल्डच्या दिल्लीतील ऑफिसवर छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन आता काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

    केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विरोधकांना संपवण्याचा चंगच बांधला असून, ईडीच्या कारवाया हा त्याचाच भाग आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देऊनही भाजपा सरकारचे समाधान झालेले नसल्याने आता नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या देशभरातील कार्यालयावर छापेमारी केली आहे. ईडीची ही ठापेमारी केवळ राजकीय सूडबुद्धीने केली असल्याचा, आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

    यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणा आता भाजपाच्याच शाखा झाल्या आहेत. दिल्लीतील बॉस सांगतील त्याच्या इशाऱ्यावर नाचण्याचे काम या यंत्रणांना राहिले आहे. या संस्थांचे स्वातंत्र्य हिरावले गेले असून विरोधी पक्षाच्या लोकांना नाहक त्रास दिला जात आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याची ओरड करून कारवाई केला जात आहे. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राने स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देत देशसेवा केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम टंडन, आचार्य नरेंद्र देव, रफी अहमद किडवई या महान नेत्यांनी या वर्तमानपत्राची स्थापन केली आहे. स्वातंत्र्यानंतरही लोकशाही, संविधान व काँग्रेसचा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी तोट्यात असतानाही नॅशनल हेरॉल्ड वर्तमानपत्र चालू ठेवले होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणी एका पैशाचाही व्यवहार झालेला नसताना केवळ गांधी कुटुंबाला त्रास देण्याच्या हेतूने कारवाई केली जात आहे.

    देशात महागाईसह अनेक ज्वलंत प्रश्न असताना त्यावर सरकारकडे काहीच उत्तर नाही म्हणून जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ईडी, सीबीआयमार्फत विरोधकांवर दडपशाही केली जात आहे. विरोधकांना संपवण्याची भाषा भारतीय जनता पक्षाकडून केली जात असून देशातील सर्व राजकीय पक्ष संपून फक्त भाजपाच राहिल असे विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांने केलेले आहे. गांधी कुटुंब व त्यांच्याशी संबंधित नॅशनल हेराल्डवरील कारवाई सुद्धा विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच केली जात आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना घाबरत नाही. जनतेचे हितासाठी काँग्रेस पक्ष सरकारच्या विरोधात आवाज उठवतच राहिल. बलाढ्य इंग्रज सत्तेला देश सोडून जाण्यास भाग पाडले याची आठवण भाजपाने ठेवावी. भाजपाने कितीही अन्याय, अत्याचार केला तरी काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने त्यांना उत्तर देईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.