
धान खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला बळी पडावे लागत आहे. त्यातच यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी त्याचप्रमाणे लागणारे रासायनिक खते यांची खरेदी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सडक अर्जुनी : शासनाने यंदाच्या रब्बी हंगामात खरेदीची मर्यादा ठरवून दिली असतानाच काही दिवसांपूर्वी मर्यादेपर्यंतची धान खरेदी करून जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे धान घरीच पडून आहेत. त्यामुळे बंद पडलेली धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी. येत्या सर्वच हंगामात नियमित धान खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात यावे. या मागणीला घेऊन शेतकऱ्यांनी बुधवार २२ जून रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोहमारा टि – पॉईंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक प्रभावित होणार आहे.
धान खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला बळी पडावे लागत आहे. त्यातच यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी त्याचप्रमाणे लागणारे रासायनिक खते यांची खरेदी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, शासनाचे व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष् होत असून शेतकरी आस्मानी संकटासह सुलतानी संकटात सापडलेला आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात एल्गार पुकारला असून या गंभीर बाबीकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी या उद्देशाने तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील आयोजक शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाने मात्र, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प होणार आहे.