इस्लामपुरात राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा; महाराष्ट्राला तिसऱ्यांदा तर सांगली जिल्ह्यास पहिल्यांदा मान

इस्लामपूर येथे २४ वी युथ राष्ट्रीय पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा १० मे रोजी सुरू होत आहेत. महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा हा तिसऱ्यांदा मान मिळत आहे. यापूर्वी २०११ साली शेगाव (बुलढाणा) येथे, तर २०१६ साली नागपूर येथे राष्ट्रीय स्पर्धा झाल्या होत्या.

    इस्लामपूर / विनोद मोहिते : इस्लामपूर येथे २४ वी युथ राष्ट्रीय पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा १० मे रोजी सुरू होत आहेत. महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा हा तिसऱ्यांदा मान मिळत आहे. यापूर्वी २०११ साली शेगाव (बुलढाणा) येथे, तर २०१६ साली नागपूर येथे राष्ट्रीय स्पर्धा झाल्या होत्या. इस्लामपूर येथील २४ व्या युथ राष्ट्रीय स्पर्धेतून देशाचे भारतीय संघ निवडले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धेला मोठे महत्व आहे. या स्पर्धेचे संयोजन महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला साजेसे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

    सांगली जिल्ह्याने १९८३, १९८७, १९९५ व २००३ साली खुल्या गटाच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केलेले आहे. राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा प्रथमच सांगली जिल्ह्यात इस्लामपूर शहरात होत आहेत. इस्लामपूर शहर व सांगली जिल्ह्याच्या व्हॉलीबॉल खेळाला मोठी परंपरा व इतिहास आहे. एक काळ असा होता,भारतीय व्हॉलीबॉल संघात निम्मे खेळाडू इस्लामपूर व परिसरातील होते. वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांनी त्याकाळी कुस्ती व कबड्डीसारख्या खेळांना मोठे प्रोत्साहन दिले. तर राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल व क्रिकेटसह सर्वच खेळांना सातत्याने पाठबळ देत आहेत. वाळवा तालुक्यातील व्हॉलीबॉलसह सर्वच खेळांची वैभवशाली परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.

    इस्लामपूर येथील युथ राष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांचे २२ राज्यांचे संघ, तर महिलांचे २० राज्यांचे संघ सहभागी होणार आहेत. यातील आघाडीच्या संघातील खेळाडूंचा खेळ,त्यांचे तंत्र पहाण्याची संधी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील खेळाडूंना मिळणार आहे. यातून निश्चितपणे या भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळून या भागातून भविष्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील. खेळाडूप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र सह राज्यातील क्रीडाप्रेमींना ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे.

    पाश्चात्य राष्ट्रातील स्पर्धेप्रमाणे नियोजन

    पाश्चात्य राष्ट्रातील स्पर्धेप्रमाणे किंवा देशातील आयपीएल क्रिकेट, प्रो कबड्डीच्या धर्तीवर अतिशय भव्य व आकर्षक नियोजन केले गेले आहे. या स्पर्धेत खेळ पाहताना क्रीडाप्रेमींनी खेळाचा आनंद घेता यावा,असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

    संपूर्ण महाराष्ट्र राज्यात व्हॉलीबॉल खेळाचा जोमाने प्रसार व प्रचार करून हा खेळ लोकांच्यापर्यंत न्यायचा प्रयत्न आहे. सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुलींचा संघ पहिल्या तीन संघात आहे, तो संघ अग्रभागी नेताना आणि मुलांचा संघ पहिल्या दहा संघात आणन्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमचे सर्व सहकारी व व्हॉलीबॉल खेळास वाहून घेतलेले क्रीडा संघटक व मार्गदर्शकांच्या सहकार्याने नजीकच्या काळात आम्ही यामध्ये यशस्वी होवू, असा मला विश्वास आहे.

     – प्रतिक पाटील, अध्यक्ष, महराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल