nagpur chandan hi chandan program
गानकोकीळा लता मंगेशकर यांना समर्पित असलेला यंदाचा 'दैनिक नवराष्ट्र'चा दिवाळी अंक 'लता'चे प्रकाशन करताना गायक राहुल देशपांडे, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, महामेट्रोचे अनिल कोकाटे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, गायिका आर्या आंबेकर, स्मार्ट सिटीचे सीईओ चिन्मय गोतमारे, प्रतिभा मेंढेकर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे.

  नागपूर, सिटी रिपोर्टर : कितना प्यारा कितना सुंदर, खडा है ईश ईश्टीकासनपर! खड़ा है मेरा प्यारा ईश्वर, दोनों हाथ रखे कटीपर! तुलसी हार कंठी मे शोभित, कटी पे पितांबर भी आजित ! जगदुरू संत तुकोबांनी मराठीत ओवीबद्ध केलेले हेच विठ्ठलाचे रूप आजही सकल मराठी हृदयावर कोरले गेले आहे. होय ही रचना तुकारामांचीच ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ या अभंगाचा हा भावानुवाद आहे. अशाच तुकारामांच्या हिंदी अनुवादित अभंग श्रवणाचा मनमुराद आनंद आज हजारो नागपूरकरांनी लुटला. निमित्त होते ‘दैनिक नवराष्ट्र’च्या वतीने मंगळवारी आयोजित ‘चंदन ही चंदन’ कार्यक्रमाचे. खचाखच भरलेल्या कवीवर्य सुरेश भट सभागृहात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि गायिका आर्या आंबेकर यांच्या आवाजातील हरिनामाची भक्तिधारा ओसंडून वाहिली.

  नवभारत माध्यम समूहाचे संचालक वैभव माहेश्वरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे अनिल कोकाटे, सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित, ग्रामिणचे पोलिस उपअधीक्षक संजय पुरंदरे, संगीत दिग्दर्शक प्रतिभा मेंढेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

  गानकोकीळा लता मंगेशकर यांना समर्पित असणारा यंदाचा दिवाळी अंक आणि स्कूल कॉफी टेबल बूकचे या दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्रृती माहेश्वरी, राघव माहेश्वरी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार आशीष देशमुख, काँग्रेस नेते गिरीश पांडव, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त राम जोशी, कोराडी वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता अभय हरणे, महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

  राहूल देशपांडे याने ‘हरी जय जय रामकृष्ण हरी’चा गजर सुरू केला आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. या भजनाने त्याने वातावरण निर्मिती केली. उपस्थित प्रत्येकजण टाळ्यांसह मान डोलवित त्याला साथ देऊ लागले. आर्याने कितना प्यारा कितना सुंदर खड़ा है ईश ईश्टीकासनपर या रचनेद्वारे रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यापाठोपाठ राहूलने गायिलेल्या करूंगा पूजा तेरी मैं ए केशव इस भाती, जहाँ है तेरेही चरण वही पाऊ मै शांत! या अभंगाने कार्यक्रमाला वेगळी उंची मिळवून दिली. आर्याने गायिलेल्या जहाँ दया, क्षमा, शांती हो, आनो वही है ईश्वर का घर ! उस घर में रहने को आतूर रहता है परमेश्वर !! या रचनेलाही प्रेक्षकांनी उचलून धरले. राहुलने एका पाठोपाठ गायिलेल्या आप ज्ञानीयों के राजा आणि चंदन ही चंदन या अभंगांना प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद लाभला.

  आर्या आणि राहूल यांनी अन्य रचनाही सादर केल्या. या बहारदार कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुळकर्णी यांनी तर उद्घाटनीय सोहळ्याचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. आदित्य ओक, प्रसाद जोशी, निखिल फाटक, अनय गाडगीळ, रोहन वनवे, निनाद मुळावकर या वाद्यवृंदांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रायोजक संजय घोडावत ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., साई श्री हॉस्पिटल, एमआयटी मेअर्स, कॉसमॉस बँक, भारती विद्यापीठ, टूनवल ई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, संकल्पा रिडक्शन फॉर ए हेल्दी लाईफ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट, ओंकार एंटरटेनमेंट, वर्षा अॅडव्हर्टाइजमेंट आदी होते.

  मी नागपूरकर
  नागपूरकर संपूर्ण कार्यक्रमादरम्यान दाद देत होते. राहूल देशपांडे यानेही उपस्थितांच्या कालासक्तीला मनापासून दाद दिली. मी सुद्धा नागपूरकर आहे. आपण मनापासून प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळेच अधिक चांगले गाण्याची उर्मी मिळत असल्याचे तो म्हणाला.