गरबा खेळण्यासाठी गेलेल्या कुटूंबाच्या घरात वॉचमननेच मारला डल्ला

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील उमा दर्शन सोसायटीमध्ये राहणारे पटेल कुटुंबीय काल गरबा खेळण्यासाठी शहाड पाटीदार भवन येथे गेले होते.

    कल्याण : गरबा खेळण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरातून चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजाराचा मुद्देमान लंपास केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीचा वॉचमन गगन बहादूर व त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहार. घटनेनंतर हे दोघे पती-पत्नी नेपाळ पळून गेल्याची माहिती समोर येतेय. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोन्ही फरार चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

    कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरातील उमा दर्शन सोसायटीमध्ये राहणारे पटेल कुटुंबीय काल गरबा खेळण्यासाठी शहाड पाटीदार भवन येथे गेले होते. गरबा खेळून घरी परतल्यानंतर त्यांना घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांना माहिती देण्यात आली. महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या इमारतीत वॉचमन म्हणून काम करणारे गगन बहादुर व त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने इमारतीच्या डक मध्ये शिडी लावून पटेल यांच्या घराच्या बाथरूमच्या खिडकीतून घरात शिरले . बेडरूम मधील कपाट फोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले . पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोघांचा शोध सुरू केला. हे दोघेही नेपाळला पळून गेल्याची माहिती आता समोर येतेय. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.