dy patil stadium

भारतामध्ये ११ ते ३० ऑक्टोबर होत असलेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधील महत्वाचे ५ सामने नेरुळच्या नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये १२, १५, १८, २१ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहेत.

  नवी मुंबई: जगातील सर्वात लोकप्रिय क्रीडाप्रकार असणाऱ्या फुटबॉलची १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२२ (Football Tournament 2022) भारतात होत असून नवी मुंबई (Navi Mumbai) शहराला यजमान शहराचा बहुमान लाभलेला आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणाऱ्या फुटबॉल खेळाडूंच्या व क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी या अनुषंगाने कोणतीही कमतरता राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश सर्व प्राधिकरणांना दिले.

  भारतामध्ये ११ ते ३० ऑक्टोबर होत असलेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमधील महत्वाचे ५ सामने नेरुळच्या नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये १२, १५, १८, २१ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहेत. या अनुषंगाने यजमान शहर म्हणून करावयाच्या तयारीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सविस्तर आढावा घेतला.

  याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, वाहतुक पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, क्रीडा विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे व इतर विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी त्याचप्रमाणे फिफाच्या पदाधिकारी रोमा खन्ना, मनदीप सहरन, अर्पिता नाखवा, श्रुती दागा, उमाशंकर कनोजिया तसेच डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियम व्यवस्थापनाचे संचालक वृंदन जाधव आणि संबंधित महापालिका, पोलीस अधिकारी व फुटबॉल फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.

  प्रत्येक दिवशी २ सामने याप्रमाणे ५ दिवस डॉ. डि.वाय.पाटील स्टेडियम येथे सामने होणार असून विशेष म्हणजे या स्पर्धेचा अंतिम सामना ३० ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममध्ये होणार आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये अमेरिका, मोरोक्को, ब्राझिल, जर्मनी, नायजेरिया, चिली, न्युझीलंड, स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन, जपान, टान्झानिया, कॅनडा, फ्रान्स आणि यजमान भारत अशा १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

  नवी मुंबई महानगरपालिकेने २०१७ साली नवी मुंबईत झालेल्या फिफा स्पर्धेच्या वेळी विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेक्टर १९ नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये या स्पर्धेतील सामन्यांपूर्वीचा सराव हे फुटबॉल संघ करणार असून त्याठिकाणची सर्व व्यवस्था सुसज्ज राहील व विशेषत्वाने फ्लड लाईटच्या रिफोकसिंगची कामे गुणवत्तापूर्ण व जलद करून घ्यावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले.

  नवी मुंबई शहरामध्ये जागतिक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉल फिव्हर निर्माण व्हावा यादृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ला याच कालावधीत सुरुवात होत असल्याने शहरातील महत्वाच्या चौकांचे व प्रदर्शनी जागांचे फुटबॉल खेळाच्या अनुषंगाने सुशोभिकरण करण्यात यावे अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.

  स्वच्छ शहर हा नवी मुंबईचा केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही लौकीक असून त्यादृष्टीने शहरातील स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी यावेळी दिले. वैद्यकीय व अग्निशमन पथकांनी फुटबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य ठिकाणी आपली पथके व रुग्णवाहिकेसह इतर वाहने तैनात ठेवावीत असे सूचित करतानाच सामन्यांच्या दिवशी विशेष दक्षता घेण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.

  हे सामने बघण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडारसिक येणार असल्याने वाहतूक व पार्किंग व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी वाहतुक पोलीस विभागाला दिल्या. वाहतुक पोलीसांना आवश्यक त्या सर्व बाबींच्या नियोजनात महानगरपालिकेच्या संबंधित विभागांनी संपूर्ण सहकार्य करावे व परस्पर समन्वयाने योग्य नियोजन करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

  वाहतूक व पार्किंग नियोजनामधील महत्वाचा घटक म्हणजे सूचना फलक असून हे सूचना फलक नागरिकांना सहज दिसतील अशाप्रकारे दर्शनी जागी प्रदर्शित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या कालावधीत स्टेडियम परिसरात पाणी पुरवठा सुरळीत राहील याचीही दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

  स्पर्धेच्या सामन्यांबाबत नवी मुंबईसह सर्व एम.एम.आर. क्षेत्रात व्यापक प्रसिध्दी होणे गरजेचे असून त्यादृष्टीने फिफा व्यवस्थापनामार्फत कार्यवाही व्हावी असे सूचित करतानाच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही शहरातील प्रसिध्दीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना दिल्या.

  नवी मुंबईत जागतिक स्तरावरील नामांकित महिला फुटबॉल खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी या निमित्ताने नवी मुंबईकर नागरिकांना उपलब्ध होणार असून विशेषत्वाने युवक व त्यातही प्रामुख्याने युवती मोठ्या संख्येने हे सामने बघण्यासाठी उपस्थित राहतील तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही हे सामने पाहण्यासाठी उपस्थित राहतील अशा प्रकारे प्रोत्साहित करावे व नियोजन करावे असेही आयुक्तांनी यावेळी सूचित केले.

  नवी मुंबई शहराला पुन्हा एकवार आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकण्याची संधी १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२२  स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला लाभली असून स्वच्छ व सुंदर शहराप्रमाणेच क्रीडानगरी असाही नवी मुंबईचा नावलौकीक व्हावा यादृष्टीने महानगरपालिकेसह सर्व संबंधित प्राधिकरणांनी कार्यवाही करावी आणि नवी मुंबईकर नागरिकांनीही या जगभरातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सामन्यांच्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.