नवी मुंबई पोलिसांना मिळणार अतिरिक्त पोलिसांची कुमक, पोलिसांची झाली प्रचंड दमछाक

सकाळचा नाष्टा तसेच दुपारच्या जेवणाची सोय ही त्यांना स्वतःलाच करावी लागली असल्याच निदर्शनास आलं आहे.

    नवी मुंबई : सकल मराठा मोर्चा काल नवी मुंबईत दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस काल रात्रीपासूनच बंदोबस्ताला उभे ठाकले असून त्यांना आराम मिळावा यासाठी नवी मुंबई पोलिसांनी ३०० इतर कर्मचारी, ५ पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, तसेच इतर ६ सुरक्षा बलांची देखील मदत घेण्यात आली आहे. ही अतिरिक्त सुरक्षा मदत मिळाल्यावर नवी मुंबईतील पोलिसांना १२ तासांचा आराम मिळणार आहे. सध्यस्थीत ऐरोली टोल नाका, वाशी टोल नाका, एपीएमसी मार्केट, वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असून ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आराम करण्यासाठी सोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोर्चेकर्‍यांनी दिले जेवण आणि पाणी

    करोडोच्या जन समुदयाला नियंत्रित करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचा फक्त अडीच हजार ते तीन हजारांचा पोलीस बंदोबस्त होता. काल रात्री पासून ड्युटीवर असलेल्या पोलिसांना मराठा मोर्चातील लोकांनी जेवण आणि पाणी दिले. मात्र सकाळचा नाष्टा तसेच दुपारच्या जेवणाची सोय ही त्यांना स्वतःलाच करावी लागली असल्याच निदर्शनास आलं आहे. मोर्चाचे नियोजन निश्चित नसल्याने नवी मुंबई पोलिसांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.