विजेत्यांचा होणार गौरव सोहळा, दि. बा. पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजन

सदर चळवळ स्पर्धेत दुसऱ्या चरणात विविध कला आणि साहित्य सादर केलेल्या प्रकारातील गुणवंत विजेत्यांना व दि. बा. पाटील यांच्या कार्याची व विचारांची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या समर्पित शिक्षक यांस माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात येणार आहे.

    नवी मुंबई : नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आयोजित दि. बा. पाटील स्फूर्ति स्थान या चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणातील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ व या चळवळ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयीन मधील समर्पित शिक्षकांचा सन्मान सोहळा शनिवार 13 जानेवारी रोजी दि. बां च्या जयंती दिनी त्यांच्या जन्मभूमीत म्हणजेच उरण तालुक्यातील जासई येथील मंगल कार्यालय हॉल मध्ये सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

    यावेळी सदर चळवळ स्पर्धेत दुसऱ्या चरणात विविध कला आणि साहित्य सादर केलेल्या प्रकारातील गुणवंत विजेत्यांना व दि. बा. पाटील यांच्या कार्याची व विचारांची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या समर्पित शिक्षक यांस माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात येणार आहे. या गौरव सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, शेकाप नेते जे. एम. म्हात्रे, रायगड कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, दि. बा. यांचे सुपुत्र अतुल पाटील, उरण विभागातील शेकाप नेत्या सीमा घरत, जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत, उपसरपंच माई पाटील आदी मान्यवर पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. असे चळवळ स्पर्धेचे आयोजक व नवी मुंबई मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी सांगितले आहे.

    सदर सोहळ्याचे नियोजन जासई गाव ग्रामस्थ व वाशीगाव ग्रामस्थ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून जासई गावचे ग्रामस्थ सुरेश पाटील व विनोद म्हात्रे हे या सोहळ्याचे कार्यक्रम समन्वयक म्हणुन जबाबदारी पार पाडणार आहेत. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी नुकतेच जासई गाव ग्रामस्थ व नवी मुंबई पुनर्वसन संस्थेच्या संयोजन समितीची बैठक जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज येथील हॉलमध्ये घेण्यात आली होती.

    नवी मुंबईतील व देशातील निवासी व मूळ निवासी नागरिक यांचे मूलभूत हक्क आरक्षित आणि सुरक्षित रहावेत यासाठी दि. बा.पाटील साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी देशातील सर्व धर्मियांसाठी त्याग व संघर्ष करून दिलेला विचार हा आंदोलनाच्या स्वरुपात सतत तेवत रहावा म्हणुन आयोजित केलेल्या या चळवळरुपी स्पर्धेतून प्राप्त कला व साहित्याच्या रूपाने प्रज्वलित रहावा या उद्दिष्टाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.