
नवी मुंबई सानपाडा पामबीच येथील नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने शाडूच्या मातीपासून साकारलेल्या सोनखारच्या राजाची स्थापना केली होती. यंदा मंडळाचे २७ वे वर्ष होते.
नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा, पामबीच येथील नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या शाडूच्या मातीपासून साकारलेल्या सोनखारच्या राजाचे विसर्जन यावर्षी मंडळाच्याच महिला भगिनींनी उत्सव स्थळीच बनविण्यात आलेल्या कृत्रिम हौदात केले. नवी मुंबई पालिकेच्या स्थानिक माजी नगरसेविका वैजयंती भगत यांनी पुढाकार घेत इतर महिलांना प्रोत्साहित केले. या घटनेने सर्वत्र कौतुक होत असून महिलांनी घेतलेला हा पुढाकार समस्त महिला वर्गाला प्रोत्साहित करणारी घटना ठरली आहे.
नवी मुंबई सानपाडा पामबीच येथील नाखवा सिताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने शाडूच्या मातीपासून साकारलेल्या सोनखारच्या राजाची स्थापना केली होती. यंदा मंडळाचे २७ वे वर्ष होते. मंडळातर्फे कायम ११ फुटांची मूर्ती स्थापण्यात येते. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेली तीन वर्षे ५ फुटांची मूर्ती बसवण्यास सुरुवात केली. त्यात मंडळाने पर्यावरण पूरक अशी शाडूच्या मूर्तीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार यंदा १० ते १२ किलो वजनाची शाडूची मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती जागेवरच तयार करण्यात आली. मंडळात पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावत महिलांचा सहभाग असतो. १० दिवस विविध कार्यक्रमात महिला अग्रभागी असताना आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना म्हणजेच विसर्जन करताना त्यात देखील महिलांचा सहभाग का असू नये? असा प्रश्न माजी नगरसेविका वैजयंती भगत यांना पडला होता.
त्यामुळे यंदा आपणच विसर्जन करू असा विचार करत तशी इच्छा त्यांनी आपले पती व नवी मुंबई पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांच्याकडे व्यक्त केली. कायम महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या दशरथ भगत यांनी वैजयंती भगत यांना ‘गो अहेड ‘चा इशारा दिला. त्यानुसार वैजयंती भगत यांनी पुढाकार घेतला. मात्र मंडळाच्या महिला पुढे येण्यास काहीशा कचरत होत्या. भगत यांनी महिलांना प्रोत्साहित करत स्फुल्लिंग चेतवले. वैजयंती भगत यांचे विचार पुरुषांना देखील पटले. त्यांनी देखील महिलांना प्रोत्साहित केले. पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावात वैजयंती भगत यांच्यासह महिलांनी पदर खोचून, पाण्यात उतरत लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. या प्रसंगाने अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
५ फुटांची मूर्ती ठेवत महिलांनाच विसर्जनाचा मान द्यावा
कोट -: १० दिवस आम्ही मनोभावे पूजा करतो. त्यामुळे आमच्या तना मनात बाप्पा असतो. विसर्जनाच्या वेळी मात्र आम्ही मागे असतो. याची खंत मनात कायम असायची. कोरोनामुळे समाजात अनेक गोष्टी नकारात्मक घडल्या असल्या तरी, काही गोष्टी सकारात्मक देखील घडत आहेत. आज आम्हाला मिळालेला विसर्जनाचा मान ही अशीच सकारात्मक बाब आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंध होते. यंदा निर्बंध मुक्त उत्सव साजरा करता आला. त्यात मूर्ती लहान असल्याने विसर्जनाचा आम्ही इच्छा व्यक्त केली. ती मान्य झाली आणि आम्ही महिला वर्ग बाप्पाचे विसर्जन करून भरून पावलो. मात्र मी मंडळाला विनंती करेन की यापुढे देखील मोठी मूर्ती न आणता ५ फुटांची मूर्ती करावी व महिलांना विसर्जनाचा मान द्यावा अशा माजी नगरसेविकांनी सांगितलं.