नवनीत राणांच्या वडिलांना दिलासा नाही; फरार घोषित करण्याच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

फरार घोषित करण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस यांनी केलेली मागणी मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावून त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

    मुंबई : फरार घोषित करण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे वडील हरभजन सिंह कुंडलेस यांनी केलेली मागणी मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावून त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

    शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने, जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात आपल्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया थांबवी, अशी मागणी करणार अर्ज हरभजन सिंह यांनी सत्र न्यायालयात केला होता. आपल्याला शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून मी फरार नाही असा दावा कुंडलेस यांनी केला होता. त्या अर्जावर सत्र न्यायालयाने निकाल देताना त्यांना कुठलाही दिलासा न देता याचिका फेटाळून लावली. त्यामुळे कुंडलेस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

    नेमके प्रकरण काय?

    राखीव जागेवरून खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी मोची या जातीतील नसतानाही राणा यांनी वडिलांमार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईतून तसा जातीचा दाखला मिळवला. शिवाय जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून वैधता प्रमाणपत्रही मिळवले’, अशा आरोपाखाली राणा व सिंग यांच्याविरोधात मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला तपासाअंती न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यानुसार खटल्याची सुनावणी सुरू होण्याच्या दृष्टीने आरोप निश्चिती होण्याकरिता न्यायालयाने दोघांना २२ सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले होते. दोघांनी न्यायालयात हजेरी लावली नाही.

    नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जातीचा दाखला मिळवला. तसेच जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून वैधता प्रमाणपत्रही मिळवले’, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०२१ रोजीच जातीचा दाखला रद्द केला. शिवाय राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही लावला. मात्र, राणा यांनी त्याविरोधात अपिल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. परंतु, न्यायदंडाधिकारी न्यायालयातील फौजदारी कारवाईचे हे प्रकरण सुरूच आहे.