Naxals set fire during construction, construction materials at two places in Bhamragad taluka on fire

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत कोठी-मरकनार रस्त्यावर सुरु असलेल्या बांधकामस्थळी सशस्त्र नक्षली पोहोचले. येथे नक्षलवाद्यांनी बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या जनरेटरची जाळपोळ केली. तसेच सिमेंटच्या गोण्यांची नासधूस केली. त्यांनतर नक्षलवाद्यांनी कामगारांना धमकावून काम न करण्याचे सांगितले.

  गडचिरोली : जहाल महिला नक्षली नर्मदक्का हिच्या मृत्यूप्रित्यर्थ नक्षल्यांनी २५ एप्रिल रोजी दंडकारण्यात बंद पुकारले होते. या बंद दरम्यान सोमवारी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यात दोन बांधकाम स्थळी हिंसात्मक कारवाया घडवून आणल्या आहेत. यात एका ठिकाणी एक ट्रॅक्टर, एक मिक्सन मशीन तर, दुस-या घटनेत जनरेटर सह सिमेंटच्या बॅगांची जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच, बंद दरम्यान नक्षल्यांनी झाडे तोडून मार्ग बंद केल्याची माहिती आहे. या घटनेने संबंधित दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  लष्कर येथे ट्रॅक्टरसह मिक्सन मशीन खाक
  भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम अशा लष्कर गाव परिसरात पुलाचे बांधकाम सुरु आहे. बंद दरम्यान सशस्त्र नक्षल्यांनी पूल निर्माणस्थळ गाठले. कामावरील मजूर व वाहन चालकांना धमकी देत बांधकाम स्थळावरील ट्रॅक्टर, मिक्सन मशीनला आग लावली. यात दोन्ही साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे पूल निर्माण कार्यात सहभागी मजूरांसह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपासून याच तालुक्यात पोलिसांनी चार नक्षल्यांना अटक केली होती. यामुळे, नक्षल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  कोठी-मरकनार मार्गावर जनरेटरची जाळपोळ
  याच तालुक्यात नक्षलवाद्यांनी दुसऱ्या घटनेला अंजाम दिला. भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत कोठी-मरकनार रस्त्यावर सुरु असलेल्या बांधकामस्थळी सशस्त्र नक्षली पोहोचले. येथे नक्षलवाद्यांनी बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या जनरेटरची जाळपोळ केली. तसेच सिमेंटच्या गोण्यांची नासधूस केली. त्यांनतर नक्षलवाद्यांनी कामगारांना धमकावून काम न करण्याचे सांगितले. भामरागड तालुक्यातील जाळपोळीच्या दोन्ही घटनांना जिल्हा पोलीस विभागाने दुजोरा दिला आहे.

  एटापल्ली तालुक्यात रस्त्यावर झाडे पाडली
  नक्षलवाद्यांनी बंदच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी-आलदंडी रस्त्यावर एक-दोन ठिकाणी झाडे तोडून रस्ता बंद केला होता. ही बाब सोमवारी सकाळी उघडकीस येताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून नक्षलवाद्यांनी तोडलेली झाडे हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.