‘आज्ञाधारक बघितला आता कफन बांधलेला बंडखोर बघाल’; पुण्यातून अमोल कोल्हे यांचे थेट आव्हान

अजित पवार व अमोल कोल्हे यांच्यामध्ये सातत्याने वाकयुद्ध होत असते. आता अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवार यांना इशारा दिला आहे.

    पुणे : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. बारामतीसह शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील प्रतिष्ठेची बनली आहे. शिरुरमध्ये अजित पवार गटाकडून आढळराव पाटील तर शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे यांच्य़ामध्ये लढत आहे. अजित पवार व अमोल कोल्हे यांच्यामध्ये सातत्याने वाकयुद्ध होत असते. आता अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवार यांना इशारा दिला आहे. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला आहे.

    नारायणगाव येथील सभेमध्ये अमोल कोल्हे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले, शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, या शब्दात  महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट आव्हान दिलं. जेव्हा एक भूमिका घ्यायची वेळ आली होती, तेव्हा स्वार्थासाठी सरटणाऱ्यांच्या रांगेत जायचं नाही हे ठरवलं होत. दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नहीं हा आमचा बाणा आहे. असा एल्गार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

    पुढे त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अमोल कोल्हे म्हणाले, भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला 12 सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे. माझं काम बोलत, म्हणून इथं अडकून पडावं लागलं. म्हणून आदरणीय दादांना विनम्रतेने सांगतो, साधं मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला तर प्रतिहल्ला करत. मी तर शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल तर त्याची तयारी ठेवा, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सुनावले.