पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकशाहीवर विश्वास…’

नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यावर आणि मोदींनी शरद पवार यांना दिलेल्या ऑफरवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले आहे.

    पुणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांचे दौरे वाढले आहेत. पुण्यातील लोकसभा निवडणूकीचा प्रचार येत्या 2 दिवसांमध्ये संपणार आहे. त्यामुळे अनेक नेत्यांची मांदियाळी पुण्यामध्ये जमली आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद पार पडत आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यावर आणि मोदींनी शरद पवार यांना दिलेल्या ऑफरवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले आहे. त्याचबरोबर अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी खडेबोल सुनावले आहे.

    शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील असे राजकीय भाकित केले होते. यावरुन राजकारण रंगलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांनी अजित पवारांबरोबर या आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे अशी खुली ऑफर दिली होती. यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले आहे.

    शरद पवार म्हणाले, “तीन टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ झाले आहेत. मोदींमुळे संसदीय लोकशाही संकटात आली आहे. मोदींनी केजरीवाल आणि सोरेन यांना तुरुंगात टाकलं, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच मोदींच्या ऑफरवर पवार म्हणाले, ‘लोकशाहीवर विश्वास नसलेल्यांसोबत, ज्या पक्षाचा, विचारधारेचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्यासोबत मी जाणार नाही. माझ्याकडून हे कधीही होणार नाही.’ असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.