तब्बल 52 तासांनी हसन मुश्रीफ अखेर ‘रिचेबल’; म्हणाले, ‘टीव्हीवर घरच्यांची अवस्था दिसल्याने…’

आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर तब्बल 52 तासांनी थेट कागलमध्ये दाखल झाले. आज त्यांना ईडीकडून (ED Inquiry) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर तब्बल 52 तासांनी थेट कागलमध्ये दाखल झाले. आज त्यांना ईडीकडून (ED Inquiry) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहे. मात्र, ते वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार आहेत. कागलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली. त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.

कागलमध्ये दाखल झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ‘ईडीचे पथक घरी येऊन गेले. ईडीने नोटीस पाठवली आहे. टीव्हीवर घरच्यांची अवस्था दिसल्याने मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. ईडीकडून नोटीस आल्याने वकिलांना ईडीकडून मुदतवाढ घेण्यास सांगितली आहे. मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाअखेर असल्याने त्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी आहे. त्यामुळे ईडीच्या समन्सला उत्तर देण्यासाठी महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. पहिल्या केसमध्ये केसमध्ये माझे नाव नव्हते. त्यामुळे त्यांना ईडीला उत्तर देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल’.

कुटुंबियांना मोठा दिलासा

नॉट रिचेबल असलेल्या हसन मुश्रीफ यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, पक्षाकडूनही त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. आता मुश्रीफ थेट कागलमध्ये दिसून आल्याने पक्षाला आणि कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ईडी पथकाचे समन्स

हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, अप्पासाहेब नलवडे कारखाना कर्ज प्रकरण तसेच ब्रिक्स कंपनीवरुन ईडीने दोन महिन्यात तीनदा छापेमारी केली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. शनिवारी ईडीच्या पथकाने चौकशीनंतर बाहेर पडताना ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांना समन्स बजावले होते. मात्र, संपर्क क्षेत्राबाहेर गेलेल्या मुश्रीफांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

छापेमारीनंतर फोन बंद

किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर दोन वेळा, तर घोरपडे कारखाना व जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखांवर यापूर्वी ‘ईडी’ने छापे टाकले आहेत. जिल्हा बँकेतून या दोन कारखान्यांना दिलेली कर्जे नियमानुसार असल्याचा खुलासा बँकेने केला असला, तरी मुश्रीफ यांच्या घरावर दुसऱ्यांदा छापा पडला. शुक्रवारी (१० मार्च) रात्री मुश्रीफ कोल्हापुरात आले होते, असे समजते. मात्र, काल ‘ईडी’चा छापा पडल्यापासून त्यांचा फोन बंद होता.