गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्याही पुढे, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तरीही राज्य सांभाळता येत नाही; जयंत पाटील यांची टीका

भाजपचा एक आमदार पोलीस ठाण्यात बंदुक घेऊन जातो आणि पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडतो. मुख्यमंत्र्यांना मी कोट्यवधी रुपये दिले आहेत असे सांगतो. मग मुख्यमंत्रीच गुन्हेगार घडवण्याचे काम करत आहेत का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित करून गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्याही पुढे गेला आहे.

    उंब्रज : भाजपचा एक आमदार पोलीस ठाण्यात बंदुक घेऊन जातो आणि पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडतो. मुख्यमंत्र्यांना मी कोट्यवधी रुपये दिले आहेत असे सांगतो. मग मुख्यमंत्रीच गुन्हेगार घडवण्याचे काम करत आहेत का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित करून गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्याही पुढे गेला आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या जवळ असणारा एक आमदार छगन भुजबळ यांना पेकाटात लाथ घालून हाकलून द्या, अशी भाषा वापरतो हे धाडस आलं कुठून? याचा विचार सर्वांनी करण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री व दोन दोन उपमुख्यमंत्री असताना यांना राज्य सांभाळता येत नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

    यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रातला दिशा दिली. त्या विचारांचा वारसा शरद पवार यांनी जोपासला. त्यामुळे या संकटाच्या काळातही कुणी कितीही वाईटावर असलं तरी जनता त्यांच्यासोबत आहे. देशाची व राज्याची वाटचाल चुकीच्या मार्गाने चालली आहे. त्याला विरोध करण्यासाठी २०२४ ची लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने लोकसभा निवडीच्या अनुषंगाने तयारीला लागा. कराड उत्तरमधून ४० हजारांचे लीड हवे आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

    उंब्रज (ता.कराड) येथे कराड उत्तर व दक्षिण मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय निश्चित मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, संगीता साळुंखे, कराड उत्तर अध्यक्षदेवराज पाटील, सुरेशराव माने, जितेंद्र पवार, मेहबूब शेख व मान्यवर उपस्थित होते.

    जयंत पाटील म्हणाले, पक्षात फूट पडली तेव्हा अनेकजन बाहेर पडले. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी कोणतेही चलबिचल न करता निर्भीडपणाने भूमिका घेऊन शरद पवार यांना साथ देऊन यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपला आहे. जे लोक बाजूला गेले त्यांचा गाजावाजा जास्त आहे त्याला घाबरून विचलित होऊ नका, जिथे जास्त वाजते तिथे काहीच नसते. देशातील व राजकीय परिस्थितीवर टिप्पणी करताना जयंत पाटील म्हणाले, महागाई, बेकारीसारखे प्रश्न वाढले आहेत. देशात रुपयाचे अवमूल्यन झाले असून, 83 रुपयांच्या खाली घसरण झाली आहे. देशाची परिस्थिती चांगली नाही. 205 लाख कोटींचे कर्ज देशावर आहे.

    तसेच प्रत्येकाच्या डोक्यावर दीड लाखांचे कर्ज आहे. जन्माला आलेल्या बाळाच्या डोक्यावर ही दीड लाखांचे कर्ज आहे. त्यामुळे भविष्यात देश आर्थिक अंधकारात जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात जी देणीघेणी सुरू आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेतून सरकार लोकांची प्रचंड फसवणूक करत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येतो. मराठा, ओबीसी आरक्षणावर सरकारचे एकमत नाही. राम आमचे श्रध्दास्थान आहेच. परंतु महाराष्ट्रातील इतर देवताही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या असून, देव धर्मावरुन राजकारण नको, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.